Gadchiroli Encounter : गडचिरोली येथील जंगलात ५ नक्षलवादी ठार, तर १ सैनिक घायाळ

गडचिरोली – विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला आहेे. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी आणि सैनिक यांच्यात अनुमाने १०  घंटे चाललेल्या चकमकीत पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना ठार केले. या चकमकीत १ सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

कोपर्शी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना नक्षलवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात २१ ऑक्टोबर या दिवशी सकाळी चकमक चालू झाली. ती दुपारी ४ वाजेपर्यंत चालूच होती. या वेळी सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. २ वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर पोली अधीक्षक यतीश देशमुख, एम्.रमेश यांच्या नेतृत्वाखाली ‘सी-६०’ पथकाच्या २२ तुकड्या आणि ‘सी.आर.पी.एफ्.’च्या शीघ्रकृती दलाच्या २ तुकड्या कोपर्शी जंगलात पाठवल्या. जंगलात २ वेगवेगळ्या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांचे अपयशच !
  • संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांना लक्षात कसे येत नाही ? नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !