War Against Intellectual Terrorism : वैचारिक युद्ध लढून हिंदु पुनरुत्थान शक्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

देहली येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ कार्यक्रम

नवी देहली : आज हिंदु धर्माच्या विरोधात जागतिक स्तरावर अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार मुख्यतः भारतीय जीवनशैली, हिंदु संस्कृती, विविध भाषा, हिंदु विधी, हिंदु सण, उत्तर भारत-दक्षिण भारत इत्यादींच्या संबंधात होतो. अशा घातक प्रचारामुळे आज सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांकडे ‘निष्पाप तरुण’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ईदच्या दिवशी बकर्‍यांच्या कुर्बानीला विरोध होत नाही; पण प्राण्यांच्या बळी देण्याला विरोध होतो. दिवाळीत फटाके फोडल्याने प्रदूषण होते; पण २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला प्रदूषण होत नाही.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलानाद्वारे उद्घाटन करतांना डावीकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. उदय माहुरकर

या विरोधात वैचारिक युद्ध लढून हिंदूंचे पुनरुत्थान शक्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.

देहलीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. १९ ऑक्टोबरला झालेल्या या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर करण्यासाठी ‘वैचारिक युद्ध लढूनच हिंदूंचे पुनरुत्थान शक्य आहे’, या सूत्रावर विचारमंथन केले. या कार्यक्रमाला लेखक अन् उद्योगपती श्री. संक्रांत सानू, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्रीधर पोतराजू, अधिवक्ता विनीत जिंदाल, श्रीमती नीरा मिश्रा आदी उपस्थित होते.

भारत जगातील पहिला ‘विकृत सामग्री मुक्त’ देश बनला पाहिजे ! – उदय माहुरकर, भारताचे माजी माहिती आयुक्त

‘ओटीटीचे धोके आणि हिंदु संघटनांचे दायित्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक, लेखक, इतिहासकार आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर म्हणाले की, चित्रपट आणि वेब सिरीज (ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार्‍या व्हिडिओजची मालिका) यांच्या माध्यमातून हिंदूंच्या देवतांची टिंगल केली जाते.

हिंदु राष्ट्र होण्यातील २ प्रमुख अडथळे म्हणजे कट्टर जिहादी मानसिकता आणि ओटीटी माध्यम (ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात). भारतातील अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून आले आहे की, ओटीटींच्या दुष्परिणामांमुळे बलात्कारांचे प्रमाण वाढले आहे. अश्‍लीलतेचे सेवन करून भारताला व्यभिचारात ढकलणे, हा हिंदुद्वेषींचा मूळ उद्देश आहे. हे सर्व टाळण्यासाठी भारताने अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घातली पाहिजे आणि भारत हा जगातील पहिला विकृत सामग्रीपासून मुक्त देश बनला पाहिजे. अश्‍लीलता पसवणार्‍यांना १० ते २० वर्षांच्या कारावासाची तरतूद असावी.

कायदा घुसखोरीसाठी नव्हे, तर भ्रष्टाचाराच्या विरोधात झाला पाहिजे ! – अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, भारताची कोणतीही समस्या सोडवणे अशक्य नाही; कारण ही मानवनिर्मित समस्या आहे. भारतात अनेक खोटे खटले खोट्या साक्षीमुळे घडतात. खोटे बोलणे हा गंभीर गुन्हा घोषित करण्यात यावा. प्रत्येक साक्षीदारासाठी नार्को आणि पॉलीग्राफी ब्रेन मॅपिंग चाचणी अनिवार्य केली, तर खोटे खटले अल्प होतील.

इतर देशांमध्ये खोट्या तक्रारींसाठी शिक्षेची तरतूद आहे; पण भारतात तसे नाही. आपल्या न्यायव्यवस्थेत पालट करण्याची आवश्यकता आहे. भारतात बेकायदेशीर कृत्यांना शिक्षा नाही. प्रतिदिन १० सहस्र धर्मांतरे होतात. भारतातील भ्रष्टाचारामुळे अवैध घुसखोरांची सर्व आवश्यक कागदपत्रे सिद्ध केली जातात. घुसखोरीसाठी नव्हे, तर भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा व्हायला हवा. धर्मांतरानंतर भारतीय नागरिकत्व रहित करण्याचा कायदा करावा. जे कायदा पाळत नाहीत, ते वन्दे मातरम् मानत नाहीत, भारतावर विश्‍वास ठेवत नाहीत, त्यांचे नागरिकत्व संपुष्टात आणले पाहिजे.

कार्यक्रमाला उपस्थित धर्मप्रेमी विचारवंत आणि हिंदुत्वनिष्ठ

ज्यांनी आम्हाला लाजवले, त्यांना आम्ही ‘महात्मा’ म्हणतो ! – मधु पूर्णिमा किश्‍वर, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ

प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि ‘मानुशी’ नियतकालिकाच्या संपादिका मधु पूर्णिमा किश्‍वर म्हणाल्या की, हिंदु समाजाविरुद्ध वैचारिक युद्ध ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. बंदुका आणि तलवारी यांच्या बळावर अन् वैचारिक युद्ध यांतून धर्मांतर झाले आहे. हिंदूंच्या रुढींमधील वाईट गोष्टी उघडकीस आणल्या आणि त्याविषयी लिहिले गेले; पण इतर धर्मांतील दुष्कृत्यांचा कुठेही उल्लेख केला जात नाही. ज्यांनी आम्हाला लाजवले, त्यांना आम्ही ‘महात्मा’ म्हणतो. हिंदु परंपरा आणि कुटुंबव्यवस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. ज्या देशात बलात्कारावर महाभारत घडले होते, त्या देशात व्यभिचार शिखरावर आहे. ही निश्‍चितच चिंतेची गोष्ट आहे. आज हिंदूंच्या हिताविषयी कुणी बोलत नाही.

संपादकीय भूमिका

हिंदु पुनरुत्थान हाेण्यासाठी हिंदूसंघटन आणि हिंदूंची ‘इकोसिस्टम’ यांसमवेतच हिंदु समाजाने साधनारत होणे आवश्यक !