Zakir Naik Pakistan Visit : झाकीर नाईक याचे पाकिस्‍तानात होत आहे भव्‍य स्‍वागत !

पाकिस्‍तानी राजकीय तज्ञांकडून होत आहे विरोध

झाकीर नाईक याचे पाकिस्‍तानात भव्‍य स्‍वागत

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा आणि भारतासाठी पसार असलेला झाकीर नाईक सध्‍या पाकिस्‍तानच्‍या दौर्‍यावर आहे. तेथे त्‍याचे सरकारकडून भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. २८ ऑक्‍टोबरपर्यंत तो पाकिस्‍तानात रहाणार आहे. येथील वेगवेगळ्‍या कार्यक्रमांमध्‍ये तो सहभागी होणार आहे. त्‍याने भारतातील वक्‍फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्‍या विरोधात सर्व मुसलमानांना एकत्र येण्‍याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाकिस्‍तानमधील पत्रकार आणि राजकीय तज्ञ यांनी मात्र झाकीर याच्‍या सरकारी स्‍तरावरून होणार्‍या स्‍वागतावर टीका केली आहे. ‘झाकीर कोणत्‍याही मोठ्या देशाचा प्रमुख किंवा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रमुख व्यक्तिमत्व नसतांना त्‍याला इतके महत्त्व का दिले जात आहे ?’, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

पाकिस्‍तान मुस्‍लिम लीगचे नेते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटवर्ती म्‍हणून ओळखले जाणारे राणा मशहूद, धार्मिक व्‍यवहार मंत्रालयाचे अतिरिक्‍त सचिव सय्‍यद अला-उर-रहमान, धार्मिक व्‍यवहारांचे संसदीय सचिव शमशेर मजारी आणि इतर अनेक नेते तथा अधिकारी झाकीर याच्‍या स्‍वागतासाठी इस्‍लामाबाद विमानतळावर उपस्‍थित होते. सध्‍या पाकमधील अनेक मोठ्या नेत्‍यांनी झाकीर याची भेट घेण्‍यासाठी रांग लावल्‍याचेही पाहायला मिळत आहे. पाकिस्‍तानचे उपपंतप्रधान महंमद इशाक डार यांनीदेखील झाकीर याची भेट घेतली आहे. झाकीर वर्ष २०१६ पासून मलेशियात रहात आहे. मलेशिया सरकारने झाकीर याचे भारताला प्रत्‍यार्पण करावे यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

संपादकीय भूमिका

भारताचा शत्रू तो आपला मित्र, या अर्थानेच पाकिस्‍तानने झाकीर याच्‍यासाठी पायघड्या घातल्‍या आहेत. भारताच्‍या जखमेवर मीठ चोळणार्‍या पाकिस्‍तानला जन्‍माची अद्दल घडवण्‍यासाठी आणि झाकीर याच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

(म्‍हणे) ‘भारतात कोट्यवधी हिंदू गोमांस खातात !’ – झाकीर नाईक याचा खोटारडेपणा

इस्‍लामाबादमधील एका कार्यक्रमाच्‍या वेळी प्रसारमाध्‍यमाच्‍या एका प्रतिनिधीने झाकीर याला विचारला की, ‘भारतात गोमांसावर बंदी घालण्‍यात आली असून तिथल्‍या मुसलमानांनी या बंदीचे पालन करायला हवे का ?’ त्‍यावर झाकीर म्‍हणाला, ‘यावर माझे एक वैयक्‍तिक मत आणि एक इस्‍लामी मत आहे. इस्‍लामी शरीयतनुसार तुम्‍ही ज्‍या देशात रहाता त्‍या देशाचे कायदे पाळले पाहिजेत; परंतु तो देश अल्ला आणि पैगंबर यांच्‍या नियमांच्‍या विरोधात नाही ना, हे तपासायला हवे. उदाहरणार्थ, एखाद्या देशाने नमाजावर बंदी घातली, तर तो कायदा मानता येणार नाही; कारण इस्‍लाममध्‍ये नमाजपठण करणे अनिवार्य आहे. भारतातील गोमांसावरील बंदी हे राजकीय सूत्र आहे. खरेतर भारतात कोट्यवधी हिंदू गोमांस खातात.

संपादकीय भूमिका

  • असे सांगून झाकीर हेच दाखवू इच्‍छितो की, भारतात गोमांस खाण्‍यावर कुणीही बंदी आणू शकत नाही !
  • असे म्‍हणून झाकीर याने कोट्यवधी हिंदूंना एकप्रकारे ‘गोभक्षक’ म्‍हटले आहे. हिंदूंचा सातत्‍याने अवमान करणार्‍या झाकीर याच्‍यावर कधी कारवाई होणार ?