थोड्याथोडक्या पैशांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळण्याची काहींची खोड कठोर शिक्षेविना जाणारी नसते. सुलभतेने हाती असलेले खेळणे म्हणजेच भ्रमणभाष हा जसे आपल्या व्यक्तींशी संपर्क सुकर करतो आहे, तसा तो मोहाच्या जाळ्यात फसण्याचेही सोपे माध्यम आहे. त्याला भरीसभर असलेले तगडे नेटवर्क आणि सामाजिक माध्यमे यांमुळे आधीच सोपा असलेला मार्ग मानसशास्त्र आणि भावनांची हेराफेरी करत फुलांची गादी अंथरल्याप्रमाणे मऊ होतो. फुलांच्या याच गोड मार्गाला फसून स्वदेशाशी प्रतारणा केली जाते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’चा (‘बेल’चा) दीप राज चंद्रा नावाचा कर्मचारी आणि रवींद्र कुमार हा कनिष्ठ कार्य व्यवस्थापक यांना कानपूरच्या शस्त्रास्त्र कारखान्यातील माहिती पुरवल्यावरून अटक अन् कर्नाटकातील कारवार नौदल तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकला पुरवल्यावरून २ व्यक्तींना अटक ही प्रकरणे गेल्या ४ दिवसांत पुढे आली आहेत. रवींद्र कुमार याने केवळ ५ सहस्र रुपये प्रतिमहिना मिळवण्यासाठी हा प्रकार केला, हे देशासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. पैशांचा मधाळ गोडवा चाखण्यासाठी आपण भारताला विकून टाकत आहोत, इतकेही लक्षात येऊ नये का ? हा प्रश्न जागरूक नागरिकांना पडल्यावाचून रहात नाही. अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
कर्नाटकात ‘हनी ट्रॅप’ने खळबळ
कर्नाटकच्या राजकीय पटलावरही ‘हनी ट्रॅप’च्या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ मंत्र्याने स्वतःसह ४८ जणांना फसवल्याचा दावा केल्याने कर्नाटकच्या राजकारणात नैतिकता आणि सुरक्षितता यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमदार, नेते आणि न्यायाधीश यांसारख्या उच्चपदस्थांनाही या जाळ्यात ओढल्याचा आरोप गंभीर आहे. ‘हनी ट्रॅप’चा सूत्रधार कोण ? याचा थोडा माग घेतल्यावर मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमधील एक प्रभावशाली मंत्रीच या जाळ्याचा सूत्रधार आहे आणि या जाळ्यात अडकलेले सर्व जण काँग्रेसमधीलच काही नेते आहेत. सध्या मंत्री के.एन्. राजण्णा यांच्यासह राज्यातील २ मंत्र्यांना या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या कटाचा सुगावा लागताच बेंगळुरूमधील एका मंत्र्याने सावधगिरी बाळगत या टोळीला रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांनी या कटामागील सूत्रधाराची संपूर्ण माहिती मिळवली. ही गंभीर माहिती मिळाल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी अन्य ३ मंत्र्यांसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हे सूत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर ते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना या प्रकरणाची माहिती देणार होते; मात्र त्याआधीच राजण्णा यांनी त्यांना स्वतःलाच या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. यामुळे देशात केवळ नावाला उरलेल्या काँग्रेसमधील गटबाजी या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. स्वपक्षातील नेत्यांचीच फसवणूक करणार्या काँग्रेसने भारतियांची केलेली घोर फसवणूक लपून राहिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अधोगतीला मिळालेली चालना भारतियांसाठी सुखावह म्हणायला हवी का ?