१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून पांढर्या प्रकाशाचा झोत आणि आनंदाचे गोळे येत आहेत’, असे दिसणे
‘५.११.२०२२ या दिवशी एका सेवेनिमित्त माझी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांच्याकडे पहाताच ‘त्यांच्याकडून माझ्याकडे पांढर्या प्रकाशाचा झोत येत आहे’, असे मला दिसले. मला हलकेपणा जाणवला. त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हा मला दिसले, ‘माझ्याकडे अगणित लहान आनंदाचे गोळे येत आहेत आणि माझ्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.’
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलत असतांना हलकेपणा जाणवणे
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोलतांना भावजागृती होणे आणि ‘त्यांच्याशी स्थुलातून न बोलता केवळ त्यांना अनुभवत रहावे’, असे वाटणे : त्यानंतर मी त्यांच्या समोरच्या आसंदीत बसले. एक साधक भ्रमणभाषवरून बोलणार असल्याने ‘बोलणे सोयीचे व्हावे’, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ स्वत:हून माझ्या जवळच्या आसंदीत येऊन बसल्या. तेव्हा माझ्याकडे गार वार्याची झुळूक आली आणि मला प्रसन्न वाटले. त्यानंतर आम्ही बोलत असतांना माझे मन निर्विचार होऊ लागले. नंतर ‘माझा देह हलका होऊन वर जात आहे’, असे मला वाटले. त्यांनी मध्येच माझ्या पाठीवरून २ – ३ वेळा हात फिरवला. तेव्हा माझी भावजागृती झाली. ‘त्यांच्याशी स्थुलातून न बोलता केवळ त्यांना अनुभवत रहावे’, असे मला वाटत होते.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या ठिकाणी पोकळी जाणवणे आणि ‘त्यांच्यातील नादशक्तीने सांगितलेली सूत्रे अंतर्मनावर कोरली जात आहेत’, असे वाटणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मला साधनेची दिशा देत असतांना ‘त्या देहातीत असून त्यांच्या ठिकाणी पोकळी आहे आणि मला त्यातून केवळ ध्वनी ऐकू येत आहे’, असे जाणवले. तेव्हा ‘त्यांच्यातील नादशक्ती माझ्या देहात जात आहे आणि त्या सांगत असलेली सूत्रे माझ्या अंतर्मनावर कोरली जात आहेत अन् त्याप्रमाणेच मला करायचे आहे’, असे मला आतून वाटू लागले. या केवळ १५ ते २० मिनिटांच्या सत्संगात भगवंताने मला भरभरून दिले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगाचा झालेला लाभ
३ अ. सत्संगातील अनुभूतींचे स्मरण होऊन ‘आनंददायी तरंग देहा-सभोवती फिरत आहेत आणि देहाभोवती लिप्त आहेत’, असे जाणवणे : नंतर मला ‘या अनुभूतींचे आलंबन होऊन माझ्यामधील सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू नष्ट व्हायला हवेत. माझ्या मनात कोणतेही विचार नकोत. केवळ आता देवाने जो परमानंद दिला, तोच हवा’, असे वाटले. ‘हा परमानंद सतत मिळवण्यासाठी मला प्रयत्नरत रहाता यावे’, यासाठी माझी भगवंताला प्रार्थना होत होती. नंतर मला पुष्कळ वेळ वरील अनुभूतींचे स्मरण होत होते. तेव्हा ‘माझ्या सभोवती आनंददायी तरंग फिरत आहेत आणि देहाभोवती लिप्त आहेत’, असे मला जाणवत होते.
३ आ. ‘साधिकेला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सत्संगात मिळालेला आनंद कुटुंबियांनाही मिळाला’, असे तिला जाणवणे : त्यानंतर रात्री झोपतांना ‘देवाने मला मुक्तच केले आहे’, असे वाटत होते. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून मला मिळालेल्या अनंत आनंदाचे तरंग घरातही प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘माझी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी भेट झाली’, हे माझ्या बाबांना (पू. सत्यनारायण तिवारी, सनातनचे १२४ वे संत, वय ७४ वर्षे यांना) ठाऊक नव्हते. ते रुग्णाईत असल्याने घरीच असतात. साधक भेटले किंवा काही चांगली आध्यात्मिक घटना घडली की, ते आनंदी असतात. त्याप्रमाणे ते आनंदी होते. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून घरातील सर्वांनाच आनंद मिळाला’, असे मला जाणवले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. माझा हा आनंद दुसर्या दिवशीही टिकून होता.
हे गुरुराया (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपण मला परमानंदाची अनुभूती दिली. आपण मला हे अनमोल क्षण श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सत्संगात अनुभवायला दिले, त्याबद्दल कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२२)