Benjamin Netanyahu In UN : आम्ही शांतता प्रस्थापित केली असून यापुढेही करत राहू !

  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे संयुक्त राष्ट्रांत विधान

  • नेतान्याहू यांचे भाषण चालू होताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलला शांतता हवी आहे. आम्ही शांतता प्रस्थापित केली असून यापुढेही करत राहू. गेल्या वर्षी जेव्हा मी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा आम्ही सौदी अरेबियाशी ऐतिहासिक करार करणार होतो; पण हमासने आमच्यावर आक्रमण केले आणि तो करार थांबवला, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत होते. नेतन्याहू यांचे भाषण चालू होताच अनेक देशांचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडले.

नेतन्याहू पुढे म्हणाले की,

१. इस्रायलचा पंतप्रधान म्हणून मी या करारावर ठाम राहीन. दोन्ही देशांमधील शांतता करार संपूर्ण मध्य-पूर्वेला वळसा घालेल. इराण हे होण्यापासून रोखत आहे.

२. मी इराणच्या हुकूमशाहांना सांगेन की, जर तुम्ही आमच्यावर आक्रमण केले, तर आम्ही त्यास निश्‍चितच प्रत्युत्तर देऊ.

३. युद्धानंतर आम्ही गाझा हमासच्या हातात देणार नाही. आम्ही आणखी एक ७ ऑक्टोबर (या दिवशी हमासने इस्रायलवर आक्रमण केले होते) पुन्हा होऊ देणार नाही. आम्ही हमासची २४ पैकी २३ बटालियन (सैनिकांची तुकडी. एका तुकडीत ५०० ते १ सहस्र सैनिक असतात) नष्ट केली आहेत.

४. हमासच्या लोकांनी लहान मुलांना जिवंत जाळले आणि महिलांवर बलात्कार केला. लोकांचा शिरच्छेद केला, कुटुंबांना मारले. हमासने २५० लोकांना ओलीस ठेवले होते.

५. हिजबुल्ला आतंकवादी संघटना शाळा, रुग्णालये आदी ठिकाणांहनू आमच्यावर रॉकेट डागते. हिजबुल्लाने इराणच्या साहाय्याने सिद्ध केलेले रॉकेट्स आम्ही नष्ट केले आहेत.

संपादकीय भूमिका

इस्रायलने आतंकवाद्यांना त्यांच्या देशात घुसून ठार मारून स्वतःच्या देशात शांतता प्रस्थापित केली. भारत असे कधी करणार ?