छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम रहाणार !
छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने दिला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्यास काही अर्थ नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नावे कायम रहाणार आहेत.
No need to rename Chhatrapati Sambhaji Nagar and Dharashiv. – Supreme Court’s intervenes.
👉 This victory is dedicated to Hindu Hriday Samrat Shri. Balasaheb Thackeray.
– @iambadasdanve Leader of Opposition, Legislative Council. pic.twitter.com/ezQcYO109E— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2024
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर ‘धाराशिव’ असे केल्यानंतर याला काही नागरिकांनी विरोध केला होता. या संदर्भात हस्तक्षेप करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवतांना म्हटले की, नामांतर झाल्यानंतर काही नागरिकांचे समर्थन, तर काही नागरिकांचा विरोध होणारच आहे. त्यामुळे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.
एम्.आय.एम्. पक्षाचा विरोध !
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास एम्.आय.एम्. पक्षाने विरोध केला होता, तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली होती. ‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतरात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देऊन याचिका फेटाळली आहे. हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे. त्यांनीच ९ मे १९८८ या दिवशी हे नामांतर केले होते. आज त्यावर न्यायदेवतेनेही एक प्रकारे मोहोर उठवली आहे.
अजून हे प्रकरण न्यायालयात ! – हिशाम उस्मानी यांच्या अधिवक्त्यांचा दावा
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्या विरोधात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महंमद हिशाम उस्मानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ‘हे प्रकरण अद्याप बोर्डावर आलेले नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली गेली, अशा खोट्या बातम्या दाखवल्या जात आहेत’, असा दावा अधिवक्ता एस्.एस्. काझी यांनी केला आहे. ‘अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याविषयी भाष्य करणार नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.