भाजपच्या माजी खासदार उमा भारती यांचे वक्तव्य
नवी देहली – प्रत्येक रामभक्ताचे मत आपल्यालाच मिळेल, असा विचार करणे चुकीचे आहे. हा अहंकार बाळगायला नको. जो आपल्याला मत देत नाही, तो रामभक्त नाही, हे वाटणेसुद्धा चुकीचे आहे. ज्यांनी मते दिली नाहीत, तेसुद्धा रामभक्त आहेत, असे वक्तव्य भाजपच्या माजी खासदार उमा भारती यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, उत्तरप्रदेशात भाजपला फटका बसण्यामागे अन्य कारणे आहेत. यासाठी नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांना उत्तरदायी धरता येणार नाही. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात ८० पैकी ३३ जागांवरच भाजपला विजय मिळवता आला. मागील निवडणुकांमध्ये भाजपने ७० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.
उमा भारती पुढे म्हणाल्या की,
१. इस्लाम मानणारे लोक हे सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था एकच असल्याचे मानून सामाजिक व्यवस्थेप्रमाणे मतदान करतात.
२. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला अपयश आले, याचा अर्थ असा होत नाही की, लोकांची रामावरील श्रद्धा अल्प झाली !
३. भाजपमध्ये अहंकार आला आहे, असे मला वाटत नाही. आम्ही पराभवाचे चिंतन करत आहोत.
४. वर्ष १९९२ मध्ये बाबरी पाडल्यानंतरही भाजपला पराभवाचा फटका बसला होता. तरीही आम्ही श्रीराममंदिर बांधले, कारण ते आमच्या कार्यसूचीत होते आणि आम्ही ते पूर्ण केले. आम्ही राममंदिराला कधीही मतांशी जोडले नाही. याचप्रमाणे मथुरा आणि काशी या ठिकाणी असलेल्या धर्मस्थळांचेही वाद आहेत; मात्र आम्ही त्या प्रश्नांचा संबंध आम्हाला मिळणार्या मतांशी जोडत नाही.