NIA Raid : तमिळनाडूमध्ये जिहादी संघटना ‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित १० ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

चेन्नई (तमिळनाडू) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ३० जून या दिवशी सकाळी ‘हिजबुत तहरीर’ या जिहादी संघटनेशी संबंधित तमिळनाडूतील १० ठिकाणांवर एकाच वेळी धाडी घातल्या. यापूर्वी या प्रकरणात मध्यप्रदेशातही धाडी घालण्यात आल्या होत्या. ‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे. ही कट्टरतावादी संघटना आधी तरुणांना प्रक्षोभक गोष्टी सांगून नंतर जिहादसाठी त्यांची मानसिकरित्या सिद्ध करते. त्यानंतर त्यांना शस्त्रेे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संघटनेवर इतर धर्मातील तरुणांना मुसलमान बनवून त्यांना जिहादी बनवल्याचा आरोप आहे.

गेल्या वर्षी मध्यप्रदेशातील आतंकवादविरोधी पथक आणि एन्आयए यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत ‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित १६ जणांना अटक केली होती. यांपैकी ८ जण पूर्वी हिंदु होते. त्यांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी बनवण्यात आले होते. (हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक)