Asaduddin Owaisi : (म्हणे) ‘धाडस असेल, तर समोर या; सावरकरांसारखा भ्याडपणा करणे बंद करा !’ – ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील घरावर फेकली काळी शाई !

खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील घरावर काळी शाई फेकण्यात आली. २५ जून या दिवशी संसदेत खासदारकीची शपथ घेतांना ओवैसी यांनी ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगाणा, जय पॅलेस्टाईन, अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे)’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर ही शाईफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शाईफेकीच्या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवैसी म्हणाले की, माझ्या घराला लक्ष्य करणार्‍या गुंडांना मी घाबरत नाही. धाडस असेल, तर माझ्या समोर या. शाई फेकल्यानंतर किंवा दगड फेकल्यानंतर पळून जाऊ नका. सावरकरांसारखा भ्याडपणा करणे बंद करा.

१. ओवैसी पुढे म्हणाले की, देहलीतील माझ्या घराला किती वेळा लक्ष्य करण्यात आले ?, याची मोजणी मी आता करत नाही. जेव्हा मी पोलीस अधिकार्‍यांना विचारले की, ‘तुमच्या नाकाखाली हे सर्व कसे घडत आहे ?’, तेव्हा त्यांनी असाहायता व्यक्त केली.

२. फेब्रुवारी २०२३ मध्ये ओवैसी जयपूरमध्ये असतांना त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. ३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्तरप्रदेशातील हापूडमधील टोल नाक्याजवळ ओवैसी यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

देशाच्या संसदेत शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’सारखी देशद्रोही घोषणा देणार्‍यांची सावरकरांचे नाव घेण्याची तरी लायकी आहे का ? राष्ट्रपतींनी अशांची खासदारकी तात्काळ रहित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला पाहिजे !