१. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्यामुळे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त स्थुलातून सेवा नसली, तरी ते निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना कर’, असे देवाने सुचवणे
‘वर्ष २०२३ मधील रामनाथी, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त माझ्याकडे नेहेमीप्रमाणे सेवा नव्हत्या. त्यामुळे माझ्या मनात विचार आला, ‘देवाच्या या समष्टी कार्यात माझ्याकडून अपेक्षित असे योगदान दिले जात नाही.’ त्यामुळे मला थोडे वाईट वाटत होते. तेव्हा देवानेच माझ्या मनात विचार दिला, ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक प्रभावी असल्याने तू अधिवेशनासाठी अधिकाधिक प्रार्थना कर.’ तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘अधिवेशनात सहभागी होणारे धर्माभिमानी आणि साधक यांच्या अधिवेशनाला येण्यातील अडथळे दूर होऊ देत.’
२. १२.६.२०२३ या दिवशी श्री नवदुर्गादेवीच्या मंदिरात गेल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवले.
३. श्री नवदुर्गादेवीला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी प्रार्थना केल्यावर तिचे मुख तेजस्वी दिसणे
१२.६.२०२३ या दिवशी मी श्री नवदुर्गादेवीच्या मंदिरात गेले होते. मी देवीला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडू दे. सर्व धर्माभिमानी आणि साधक यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर राहू दे’, अशी प्रार्थना केली. माझ्याकडून स्वत:साठी कुठलीही प्रार्थना झाली नाही. देवीला अशी प्रार्थना केल्यावर मला देवीचे मुख अधिक तेजस्वी आणि दैदीप्यमान जाणवले.
४. सूर्याला अर्घ्य देतांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी प्रार्थना करणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दिवशी, म्हणजे १६.६.२०२३ या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देतांना माझ्याकडून सूर्यनारायणाला नेहमीच्या प्रार्थना झाल्या नाहीत. केवळ ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झालेल्या सर्वांभोवती सूर्यकवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना झाली. तेव्हा मला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या स्थळाभोवती सूर्यकवच निर्माण झाले आहे’, असे दिसून आकाशात सूर्यदेव आणि नारायण दोघांचेही दर्शन झाले. त्या दिवशी दिवसभर माझ्याकडून मनातल्या मनात ही प्रार्थना होत होती.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली चौकट वाचल्यावर देवाने करून घेतलेल्या प्रार्थनांविषयी कृतज्ञता वाटणे
१६.६.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या प्रथम दिवशी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ या लेखावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेली चौकट वाचली. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य ८५ टक्के आध्यात्मिक, १० टक्के मानसिक आणि केवळ ५ टक्के शारीरिक स्तरावर होणार आहे.’ हे वाचल्यावर ‘माझ्याकडून ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी अधिक प्रमाणात प्रार्थना का होत होत्या ?’, याची जाणीव झाली आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६. ‘निःस्वार्थ भावनेने राष्ट्रकार्य करणार्या धर्माभिमान्यांप्रमाणे स्वतःमध्ये तळमळ वाढायला हवी’, असे वाटणे
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होणारे धर्माभिमानी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता किंवा ‘कुणी या कार्याची नोंद घ्यावी’, अशी अपेक्षा न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत आहेत. त्यांना कुणी मार्गदर्शक नसूनही ते स्वयंप्रेरणेने हे कार्य करत आहेत. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं आहेत, तसे ते माझ्यातही आहेत; पण माझ्यामध्ये त्यांच्यासारखी तळमळ नाही. ‘मला माझ्यात तशी तळमळ अजून वाढवायला हवी’, असे वाटले.
‘गुरुदेवांनी अशा कर्मयोगी धर्माभिमान्यांसाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे व्यासपीठ निर्माण केले’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |