
कोल्हापूर, २२ मार्च (वार्ता.) – ज्या लक्षतीर्थेश्वराच्या कमल सरोवरातील प्रथम कमलपुष्प श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण केले जाते त्या भूमीत म्हणजेच लक्षतीर्थ वसाहतीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने २४ ते २८ मार्च या कालावधीत भव्य वैकुंठगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचा प्रारंभ २४ मार्चला सकाळी ७ वाजता दिंडी सोहळ्याने होईल. सोहळ्याच्या कालावधीत प्रतिदिन श्री हरिपाठ, कीर्तन, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत, अशी माहिती ह.भ.प. बाबा महाराज केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ह.भ.प. महादेव यादव महाराज, अजित शिंदे, सुरेश चाचुर्डे, अमोल दाभाडे आणि विलास तवार यांसह अन्य उपस्थित होते.
१. हा सोहळा छत्रपती शाहू महाराज चौक, मुख्यरस्ता, लक्षतीर्थ वसाहत येथे होत आहे. यात पहाटे ५ ते ६.३० काकडा भजन, सकाळी ९ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, तर रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन होईल. यात २७ मार्चला रात्री ८ वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.
२. या सोहळ्यात प्रतिदिन १ सहस्र वाचक ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन करणार आहेत. २४ मार्चला होणार्या दिंडी सोहळ्यासाठी आषाढी वारीत शितोळे सरकार यांचा जो मानाचा अश्व सहभागी होतो तो अश्व सहभागी होणार आहे. सकाळी ७ वाजता १०८ मृदंगमणी यांचे मृदंगाचे वादन होणार आहे.
३. या सोहळ्याच्या निमित्ताने तुकोबारायांचा २१ फुटी गरुडावर आरूढ होऊन वैकुंठगमन करणार्या दृश्याचा देखावा उभा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून यासाठी ५ सहस्रांपेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लक्षतीर्थेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांनी केले आहे.