परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रे काढणार्‍या विदेशी साधिकेला ‘तुम्हाला हिदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी इतके ज्ञान कसे आहे ?’, असा प्रश्न विचारल्यावर साधिकेचे झालेले चिंतन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने वर्ष २०१६ मध्ये मी प्रथमच विदेशातून भारतात आले. त्यानंतर वर्ष २०१६ पासून मी भारतात राहून पूर्णवेळ साधना करू लागले. लहानपणापासून मला विविध गोष्टींची पुष्कळ जिज्ञासा होती. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘नरसिंहयाग’ झाला. त्या वेळी प्रथमच मला सूक्ष्मातून दृश्य दिसले आणि मी त्यासंदर्भात सूक्ष्म-चित्र काढले. ईश्वराकडून मला सूक्ष्म ज्ञानही मिळू लागले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘मी सूक्ष्म-चित्रे काढण्यास कशी शिकले ?’, तसेच ‘चित्रांशी संबंधित माहिती मला कशी मिळते ?’, यांविषयी लिहून देण्याविषयी कळवले. त्याचबरोबर हिंदु धर्माविषयीचे ज्ञान, हिंदूंच्या देवता आणि मंदिरे यांविषयीच्या कथा मला कशा ठाऊक आहेत ?, यांविषयीही त्यांनी मला लिहून देण्याविषयी कळवले. याविषयी चिंतन करतांना माझ्या लक्षात आले की, बालपणापासूनच माझ्यात जिज्ञासा, तसेच प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि संशोधन करण्याची वृत्ती आहे. साधनेला आरंभ करण्यापूर्वी ‘माझी शिकण्याची प्रक्रिया कशी होती ? आणि ‘साधनेला आरंभ केल्यापासून ‘त्यात कसे पालट झाले अन् शिकण्याची वृत्ती कशी वृद्धींगत झाली ?’, यांविषयी झालेले माझे चिंतन पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सतत शिकत रहाण्याची ओढ

अ. मी शिकण्याच्या स्थितीत असते. तेव्हाच मी समाधानी असते. अन्यथा मी पुष्कळ अस्वस्थ होते आणि ‘मी वेळेचा दुरुपयोग करत आहे’, असे मला वाटते. जसे ‘एखादा पदार्थ खावा’, असे आपल्याला तीव्रतेने वाटते आणि तो न मिळाल्यास तो मिळवण्यासाठी आपण जसे धडपडतो, अगदी तसेच मला होते. मी जर काही शिकत नसेन, तर मला त्याचे वाईट वाटते.

आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे एक सुवचन आहे, ‘जिज्ञासूच ज्ञानाचा खरा अधिकारी आहे.’ साधनेत येण्याआधीपासूनच प.पू. भक्तराज महाराज यांचे हे वचन मी अनुभवत आहे. माझ्यात जितकी जिज्ञासा असते, तितक्या सहजतेने मी ती गोष्ट शिकते आणि ती अधिक कालावधीसाठी माझ्या लक्षात रहाते.

इ. ‘आपले ध्येय आपल्या क्षमतेपेक्षा अधिक उच्च असेल, तर ती ध्येयनिश्चितीच व्यक्तीच्या असमर्थतेवर मात करते आणि आपले ध्येय साध्य करून घेते’, या विचाराने मला अधिक चांगल्या प्रकारे शिकता आले. नवीन काही शिकण्याची थोडीशी जरी इच्छा असेल, तर अशक्य असे काहीच नाही.

२. साधनेत येण्यापूर्वी असलेली जिज्ञासा आणि आत्मसात झालेली विविध कौशल्ये

२ अ. मी लहान असतांना जगातील विविध ठिकाणची प्राचीन संस्कृती, तसेच आदिवासी लोकांची जीवनशैली, दिनचर्या, विधी, प्रथा-परंपरा यांच्याविषयी मला पुष्कळ जिज्ञासा होती.

२ आ. वास्तव असलेल्या ठिकाणची भाषा, संस्कृती, लोककथा, नृत्य आणि खाणे-पिणे इत्यादी शिकण्याची जिज्ञासा असणे : साधनेला आरंभ करण्यापूर्वी मी काही काळ ‘वेल्स’मध्ये (‘युनायटेड किंगडम’मधील एक भाग) रहात होते. तेथील संस्कृतीविषयी जाणून घेण्याची मला पुष्कळ जिज्ञासा होती. मी वेल्श भाषा, तेथील संस्कृती आणि लोककथा, तेथील खाणे-पिणे इत्यादी शिकू लागले. मी ज्या भागात रहात होते, तेथे त्यांचा एक स्थानिक आणि पारंपरिक नृत्यप्रकार होता. तेथील काही जणांना एकत्र करून मी नृत्यशाळेत जाऊन ते नृत्य शिकले. आता मी भारतात आहे आणि येथील संस्कृतीविषयीही मी जाणून आहे.

२ इ. कौशल्य आत्मसात करण्याची तीव्र इच्छा आणि अविरत प्रयत्न यांमुळे कौशल्य लवकर आत्मसात होणे : जेव्हा मला एखादे कौशल्य आत्मसात करायचे असे, तेव्हा मनात इतकी तीव्र तळमळ असे की, ‘ते कौशल्य आत्मसात करण्याविना मला जगात आणखी काही नको’, असे मला वाटायचे. त्यासाठी मी अविरत सराव करायचे आणि ते कौशल्य काही दिवसांतच आत्मसात करायचे. काही दिवसांनी ही माझी आवड सहजतेने पालटत असे.

२ ई. साधनेला आरंभ करण्यापूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये : एखादी नवीन गोष्ट दिसल्यास मला त्याची भुरळ पडून ‘ती गोष्ट करण्यास जमेल का ?’, हे मी पहात असे. यामुळे मी पुढील गोष्टी शिकले.

१. सुतारकाम आणि लाकडावर कलाकुसर करणे

२. कापसापासून यंत्रावर दोरा बनवणे

३. प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून प्राणी ओळखणे आणि त्यांचा मार्ग शोधणे

४. ज्योतिषशास्त्रानुसार बागकाम करणे, म्हणजे चंद्र आणि तारे यांच्या स्थितीवर अवलंबून असलेल्या पिकांची लागवड करणे

५. धनुर्विद्या (नेमबाजी)

६. पुस्तकबांधणी

७. संगीत (गाणे गाण्यास)

८. दोरीवरील कसरत करणे

२ उ. सर्व पैलू जाणून घेण्याची जिज्ञासा असल्याने सखोल अभ्यास करणे : मी एखादी वस्तू पहाते, तेव्हा ‘ती कशी बनली असेल ?’, याचा मी अभ्यास करू लागते. ही अभ्यासाची प्रक्रिया आपोआप आणि नेहमी होत असते. ‘सागराच्या तळाशी काय आहे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्याच्या तळाशीच जावे लागते, तसेच विश्वातील प्रत्येक गोष्टीमागचे रहस्य जाणून घ्यायचे असेल, तर खोलवर अभ्यास केल्यावरच ते रहस्य कळणे शक्य आहे.

२ ऊ. नवीन कौशल्ये शिकतांना आत्मसात केलेले गुण साधनेत साहाय्यभूत ठरणे : मी जे काही शिकत असे, त्यातून पुढील कला शिकणे मला साहाय्यभूत होत असे, उदा. नेमबाजी शिकण्यासाठी चांगली एकाग्रता असणे आवश्यक असते, तसेच ‘वार्‍याची दिशा आणि आपल्या शरिराची स्थिती कशी असायला हवी ?’, यांविषयी माहिती असणे आवश्यक असते. नवीन कौशल्ये शिकतांना मी आत्मसात केलेले गुण मला आता साधनेत साहाय्यभूत ठरत आहेत.

३. साधनेला आरंभ केल्यावर शिकण्याच्या प्रक्रियेत पालट होऊन देवतांविषयीची जिज्ञासा वृद्धींगत होणे

३ अ. अध्यात्मशास्त्र शिकायला मिळाल्याने आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्याचा आनंद होणे

१. साधनेला आरंभ केल्यावर ‘अमर्याद आणि परिपूर्ण असा विषय मिळाला’, असे मला आतून वाटू लागले. ‘हे शास्त्र (अध्यात्मशास्त्र) शिकले, तर मला आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील’, याचा मला पुष्कळ आनंद झाला.

२. मला हळूहळू देवतांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होऊ लागली. ‘देवता नेमक्या कोण आहेत ? खरंच त्या पृथ्वीवर होत्या का ?’, असे प्रश्न मला पडू लागले.

३. मी अनेकदा देवतांच्या मूर्ती, तसेच मंदिरांविषयीची पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांनी बनवलेली चलचित्रे ‘ऑनलाईन’ पहात असे. यातून ‘देवता आणि मंदिरे यांचे शास्त्र किती सखोल आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा सखोल अभ्यास करण्याची माझी इच्छा वाढली. वास्तुशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र हे अध्यात्माशी संबंधित असून मंदिरांच्या अभ्यासातून त्यांतील अनेक टप्पे शिकता येतात.

४. जसजसे मी देवतांविषयी अधिक वाचत गेले, तसतशी माझ्या मनात त्यांना भेटण्याची ओढ निर्माण होत गेली. ‘देवतांना भेटल्यावरच मला त्यांच्याविषयी खर्‍या अर्थाने शिकता येईल’, असे मला वाटत असे. माहितीजालावर देवतांविषयी उपलब्ध असलेली माहिती अपुरी आणि भावनिक स्तरावर असल्याने माझ्या मनात देवतांविषयी असलेल्या प्रश्नांना मला समाधानकारक उत्तरे मिळत नसत.

४. सूक्ष्मातील कळू लागल्यावर शिकण्याची प्रक्रिया

४ अ. भगवंत मला हळूहळू त्याच्या विविध रूपांचे दर्शन देऊ लागला आणि भगवंताच्या त्या विविध रूपांतून मला शिकायला मिळू लागले.

४ आ. सूक्ष्मातून कळू लागल्यावर उच्च लोकांतील जीव दिसणे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेतल्यावर त्यांना पहाण्याची जिज्ञासा वाढणे : यापूर्वी मी कधीही ऐकले नव्हते, असे उच्च लोकांतील जीव मला सूक्ष्मातून दिसू लागले. एकदा सूक्ष्मातून मला काही पुरुष बासरीवादन करतांना दिसले. ‘अप्सरांप्रमाणे ते पुरुषही स्वर्गलोकातील असावेत’, असे मला जाणवले. ‘त्यांना काय संबोधतात ?’, हे जाणून घेण्यासाठी मी काही साधकांना विचारले. तेव्हा त्यांना ‘गंधर्व’ असे म्हणतात, असे मला समजले. नंतर मला यक्ष, किन्नर यांच्याविषयीही माहिती मिळाली. त्यानंतर ‘अन्य पंथियांमध्येही यक्ष, किन्नर यांच्यासारखे उच्च लोकांतील जीव आहेत का ?’, हे जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्यात निर्माण झाली. त्याविषयी अभ्यास केल्यावर ‘ग्रीक पौराणिक कथांमध्ये ‘सेंटॉर’ नावाचे किन्नरांसारखे उच्च लोकांतील जीव असतात’, असे मला समजले. अशा प्रकारे उच्च लोकांतील जिवांविषयी मी अधिक जाणून घेऊ लागले आणि माझी त्यांना पहाण्याची जिज्ञासा वाढली.

४ इ. ईश्वराने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे. भगवंताने निर्मिलेले विश्व किती गुंतागुंतीचे आहे आणि ते किती बारकाव्यानिशी बनवले आहे, हे जाणून घेण्यात, तसेच ईश्वरनिर्मित प्रत्येक गोष्ट शिकण्यात मला पुष्कळ समाधान वाटते.

५. साधनेत आल्यानंतर वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांच्या स्पंदनांचा अभ्यास करणे

अ. साधनेत आल्यावर काही काळानंतर मी एखादी वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांच्या स्पंदनांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागले.

आ. ‘वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांत कोणते देवतातत्त्व आहे ? त्यांत शक्ती, चैतन्य, भाव, आनंद आणि शांती यांतील कोणती स्पंदने किती प्रमाणात (टक्के) आहेत ? आणि त्यांचे प्रक्षेपण कसे होते ?’, यांचा अभ्यास करू लागले.

इ. नंतर ‘एखादे चित्र किंवा नक्षी यांत उच्च स्तरावरील स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित होण्यासाठी मी ते चित्र अधिक चांगल्या पद्धतीने कसे काढू शकते ?’, याचे चिंतन करू लागले.

६. शिकण्याच्या प्रक्रियेविषयी सूक्ष्मातून दिसणे

आतापर्यंत मी जे काही शिकले, त्या सर्व गोष्टी माझ्या मनात एखाद्या रचनाबद्ध नकाशाप्रमाणे साठवलेल्या आहेत. ज्ञानाचा एक एक विषय म्हणजे एक एक बेट असून ती सर्व ज्ञानरूपी बेटे एकमेकांशी जोडली गेली आहेत. जेव्हा मी देवता, संत किंवा मंदिरे यांच्याविषयीच्या कथा वाचते, तेव्हा नकाशात एखादा नवीन भाग जोडल्याप्रमाणे माझ्या ज्ञानात भर पडते. मला एखाद्या विषयाशी संबंधित आणखी माहिती मिळते, तेव्हा मला नवीन माहिती मिळवण्याचा स्रोत मिळाल्यासारखे वाटते. जसजसे मी अधिक शिकत जाते, तसतसा माझ्या मनातील माहितीरूपी नकाशा सखोल होत जातो आणि त्यातून पुढचे पुढचे शिकणे सोपे होत जाते. माझ्या मनात विविध विषयरूपी नकाशे आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले असून त्यांचे वेगवेगळे थर आहेत. साधना आणि विविध कला यांचा या विषयांमध्ये समावेश आहे. मी नवीन काहीतरी शिकते आणि त्यातून माझी आणखी काही शिकण्याची तळमळ वाढते.

अशा प्रकारे ‘माझी शिकण्याची प्रक्रिया कशी होते ?’, हे मला सूक्ष्मातून कळले.

मला माझ्या आयुष्यात भगवंताच्या लीला अनुभवायच्या आहेत, त्यामुळे ‘घडलेल्या प्रसंगात साधनेतील कोणते तत्त्व भगवंत मला शिकवत आहे’, याचे मी चिंतन करण्याचा प्रयत्न करते.

७. शिकण्याच्या प्रक्रियेविषयी पालटलेला दृष्टीकोन

माझ्या आयुष्यात घडणारा प्रत्येक प्रसंग मी मला घडवण्यासाठी एक आव्हान म्हणून स्वीकारते. पूर्वी मी माझे कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करत असे; मात्र आता मी प्रत्येक प्रसंगात माझा दृष्टीकोन सुधारण्याचा प्रयत्न करते.

८. शिकण्याच्या प्रक्रियेत येणारे स्वभावदोष अन् अहं यांचे अडथळे 

माझ्यातील भावनाशीलता, नकारात्मक विचार करणे, इतरांशी तुलना करणे, निष्कर्ष काढणे, ‘मला सर्व कळते’ असा अहं, अपेक्षा करणे आणि उतावीळपणा या स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंमुळे मला शिकण्यात काही वेळा अडथळे येतात.

९. परात्पर गुरुदेवांनी शिकण्याच्या प्रक्रियेविषयी विचारणे, ही अनुभूती !

‘परात्पर गुरुदेव, माझ्या शिकण्याच्या प्रक्रियेविषयी तुम्ही कळवणे, ही माझ्यासाठी अनुभूतीच आहे; कारण मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना एक पत्र लिहिले. त्यात मी त्यांना लिहिले आहे, ‘मला भारतातील सर्व मंदिरे पहायची असून मंदिरांचे वास्तुशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र शिकण्याची माझी इच्छा आहे. यासाठी सर्व मंदिरे पहाण्यासाठी मी भारतभर भ्रमण करू शकते का ?’ पत्र लिहिल्यानंतर अगदी दुसर्‍याच दिवशी तुम्ही मला अशाच आशयाचा प्रश्न विचारला.

‘हिंदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी मला इतके कसे ज्ञान आहे ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारले, तेव्हा त्याविषयीची विविध सूत्रे माझ्या लक्षात आली.

‘हे परात्पर गुरुदेव, तुम्हीच माझ्यात प्रत्येक गोष्ट शिकण्याची क्षमता निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे माझे मन आणि विचारप्रक्रिया यांचा अभ्यासही तुम्हीच माझ्याकडून करून घेतला आहे.’

– एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (४.३.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.