सर्वोच्च न्यायालयाचे योगऋषी रामदेवबाबा यांच्याविषयी विधान
नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा आणि त्यांच्या पथकाचे योगक्षेत्रात मोठे योगदान आहे; पण ‘पतंजलि’ची उत्पादने, ही वेगळी गोष्ट आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने ‘पतंजलि’च्या विज्ञापनाविषयीच्या प्रकरणावर सुनावणी करतांना म्हटले. ‘रामदेवबाबा यांच्याप्रती लोकांमध्ये श्रद्धा आहे. लोक त्यांच्याकडे आशेने पहातात. आमचा हेतू इतकाच आहे की, लोकांनी सतर्क व्हावे’, असेही न्यायालयाने म्हटले. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाने रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात सुनावणीला उपस्थित रहाण्यापासून सूट दिली होती.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांना क्षमा नाही
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे प्रमुख डॉ. आर्.व्ही. अशोकन् यांनी न्यायालयाविषयी त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर क्षमा मागितली; पण ती मान्य करण्यात आली नाही. न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला (अशोकन् यांना) आक्षेपच होता, तर आम्हाला टिप्पणी काढून टाकण्याची विनंती करायची होती; पण तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर गेलात. त्यामुळे आम्ही तुमची क्षमा स्वीकारणार नाही.