ऋषिकेश (उत्तराखंड) येथे गंगा नदीच्या काठावर विदेशी नागरिकांची अर्धनग्न अवस्थेत मौज मस्ती !

सामाजिक माध्यमांतून टीका

ऋषिकेश (उत्तराखंड) – येथे गंगा नदीच्या काठावरील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला असून यात काही विदेशी पर्यटक अर्धनग्न अवस्थेत गंगा नदीत स्नान करतांना दिसत आहेत. यात अनेक विदेशी महिलांनी बिकिनी (पोहण्यासाठीचे कपडे) घातली असून अनेक मुले ‘हाफ पँट’ मध्ये आहेत. यावरून सामाजिक माध्यमांवर ‘गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर असल्याप्रमाणे हे लोक गंगेच्या काठी मस्ती करत आहेत’, अशा शब्दांत टीका केली जात आहे.

सामाजिक माध्यमांवर काही लोकांच्या प्रतिक्रिया

१. पवित्र गंगा नदीला गोव्याच्या समुद्रकिनार्‍यामध्ये रूपांतरित केल्यासाठी धन्यवाद पुष्करसिंह धामी. आता ऋषिकेशमध्ये अशा गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे लवकरच ते एक छोटे बँकॉक (थायलंडमधील एक शहर) बनेल.

२. ऋषिकेश हे आता धर्म, अध्यात्म आणि योग यांचे शहर न रहाता गोवा बनत आहे.

३. ऋषिकेशमध्ये अशा विकृतीला प्रोत्साहन का दिले जाते ? देवभूमी या कारणासाठी ओळखली जाते का ? त्यांनी (सरकारने) या पवित्र शहराचा नाश करण्यापूर्वी काहीतरी केले पाहिजे.

४. विदेशी लोक येथील लोकांची जीवनशैली आणि संस्कृती पहाण्यासाठी भारतात येतात; मग त्यांनी इथल्यासारखचे वागले पाहिजे.

५. जेव्हा परदेशी पर्यटक येतील, तेव्हा आपल्याला काही प्रमाणात तडजोड करावी लागेल.

६. धार्मिक शहरात अशा गोष्टी खपवून घेतल्या जाऊ नयेत.

संपादकीय भूमिका 

गंगा नदी आणि ऋषिकेश यांचे पावित्र्य जपण्याविषयी पोलीस आणि प्रशासन विदेशी पर्यटकांना सांगत नाहीत का ? अशा पर्यटकांवर कारवाई केल्यावरच इतरांवर वचक बसेल !