संपादकीय : रझाकार जिवंत आहेत….!

बहुचर्चित ‘रझाकार’ हा चित्रपट २६ एप्रिल या दिवशी हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी मार्चमध्ये हा मूळ तेलुगु भाषेतील चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर (छोटे विज्ञापन) पाहून त्यात ज्या प्रकारे धर्मांध रझाकारांकडून तलवार आणि क्रूरता यांच्या बळावर हिंदु समुदायाचे धर्मांतर करण्याची, त्यांचा छळ करण्याची दृश्ये दाखवण्यात आली, ती पाहून कुणाही हिंदूच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याविना रहाणार नाही. ट्रेलर पाहून धर्मांधांच्या संघटनांनी लागलीच हा हिंदु-मुसलमान यांच्यात वितुष्ट निर्माण करणारा चित्रपट असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. काहींनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्या; मात्र न्यायालयानेही या याचिका फेटाळून लावत चित्रपटाचा मार्ग मोकळा केला. या चित्रपटात रझाकारांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आहेत तसे मांडण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. ‘रझाकारांनी किती भयावह अत्याचार केले आणि ते एवढ्या वर्षांनी आम्हाला कळले’, अशाच काहीशा भावना चित्रपट पाहून येणार्‍या लोकांच्या आहेत.

क्रूर निझाम आणि रझाकार !

कासीम रिझवी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैद्राबाद संस्थान आणि गोवा राज्य मुक्त झाले नव्हते. हैद्राबादमध्ये धर्मांध निझामाची मनीषा पाकमध्ये सहभागी होण्याची होती किंवा तुर्कस्थानसारखे स्वतंत्र अस्तित्व जपण्याची होती. त्याचे कासीम रिझवी या क्रूर सेनानायकाच्या हाताखाली काम करणारे कडव्या मुसलमानांचे सैन्य कार्यरत होते, ते म्हणजे रझाकार ! रझाकारांचे अत्याचार केवळ भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या १ वर्षातीलच नव्हते, तर त्यापूर्वी २०० वर्षे हे अत्याचार हिंदु समाज सहन करत होता. हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होतांना हिंदूंसमोर २ पर्याय होते, एकतर त्यांनी मुसलमान व्हावे, अन्यथा हैद्राबादच्या बाहेर निघून जावे. निझाम कडवा आणि कट्टर मुसलमान होता, तसेच खुनशी, कपटी आणि क्रूर होता. त्याला हिंदूंचे छळाबळाने धर्मांतरच अपेक्षित होते. त्यामुळे हिंदूंमध्ये भय निर्माण करण्यासाठी गावेच्या गावे पेटवण्यात आली, हिंदूंची घरे, मंदिरे पाडण्यात आली. गावांतील पुरुषांना मारून हिंदु स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले, त्यांची विटंबना करण्यात आली, त्यांची धिंड काढण्यात आली. पाकमध्ये फाळणीच्या वेळी जे अत्याचार तेथील धर्मांधांनी केले, अगदी तसेच अत्याचार रझाकारांनी हिंदूंवर केले. रझाकारांच्या गटाचे मूळ नाव ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ म्हणजेच एम्.आय.एम्. हेच होते. याच नावाचा पक्ष नावापुढे केवळ ‘ऑल इंडिया’ अशी आद्याक्षरे जोडून कार्यरत आहे, हे सर्वांना लक्षात आले असेल. तत्कालीन एम्.आय.एम्.चे नृशंस अत्याचार हैद्राबाद संस्थान म्हणजे आताचा आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा सीमावर्ती भाग येथे चालू होते. म्हणजे सध्याच्या चारही राज्यांतील जनता रझाकारांच्या अत्याचारांनी होरपळून निघाली होती. एकाच वेळी अनेक हिंदूंना जिवंत जाळण्याच्या घटना घडल्या होत्या. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी स्वत:हून या अत्याचारांची नोंद घेतली होती. त्यांनी निझामाला शरण येण्यास सांगितले. निझामाने ही सूचना झिडकारली आणि तेथील हिंदूंवरील अत्याचारही वाढले. तेव्हा शेवटी सरदार पटेल यांनी भारतीय सैन्य हैद्राबादमध्ये घुसवण्याचा निर्णय घेतला. त्याला ‘ऑपरेशन पोलो’ हे नाव दिले. भारतीय सैन्याने हैद्राबादमध्ये घुसून अतुलनीय शौर्य दाखवून रझाकारांना ठार केले, त्याच्या साम्राज्याचा पाडाव केला आणि ‘संस्थान भारतामध्ये विलीन झाले’, असे पटेल यांनी घोषित केले. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीची पळपुटी मानसिकता दाखवून ‘भारतातील एका भूभागासाठी सैन्य पाठवणे अयोग्य आहे’, असे सांगून खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. सरदार पटेल मात्र निर्णयावर ठाम राहिले, अन्यथा आज तेथे हिंदू शिल्लक राहिले नसते.

रझाकारी मनोवृत्ती !

अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दिन ओवैसी

रझाकार ही क्रूर व्यक्तींच्या समुहासह एक हिंसक मनोवृत्तीही आहे. ही मनोवृत्ती जपली जात आहे, ती ओवैसी यांच्या पक्षाकडून ! त्यामुळेच काही वर्षांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना संपवतील’, असे विधान केले होते. हे विधान याच रझाकारी मानसिकतेचे आहे. ओवैसी तीच रझाकारी मानसिकता जोपासत आहेत, जी ६५ ते ७० वर्षांपूर्वी निझामाने जोपासली होती. असदुद्दीन ओवैसीही बॅरिस्टर असले किंवा पुष्कळ तार्किक युक्तीवादाची भाषा, मोठमोठे शब्द वापरून वैचारिक विरोध करण्याचा दिखावा करत असले, तरी त्यांचे अंतिम लक्ष्य निझामाप्रमाणेच आहे, यात शंकाच नाही. याची प्रचीती कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी हा कारागृहात असतांना मृत्यूमुखी पडला, तेव्हा त्याला ओवैसी यांनी ‘शहीद’ म्हणण्यातून आली. अन्सारी याने अनेक हिंदूंना आम्लाच्या (ॲसिडच्या) ड्रममध्ये बुडवून मारले, भाजपच्या आमदाराची हत्या केली, दहशत निर्माण केली. अशा क्रूरकर्म्याला ‘शहीद’ संबोधून या कृत्यांना पाठिंबा दिला आहे. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथील हिंदूंना या अत्याचारांचा विसर पडला असल्यास, त्यांच्या जखमांवरील धूळ या चित्रपटाने हटवली आहे. रझाकारी वृत्तीचा पाडाव, त्याला मुळासकट उपटून काढणे आवश्यक आहे. रझाकारांनी केल्याप्रमाणे हिंदूंची भयानक हत्याकांडे मोपला (केरळ), कोलकाता, नौखाली येथेही झाली आहेत. ‘रझाकार’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यावरही चित्रपट काढण्याची मागणी भारतियांकडून होत आहे, हे एक चांगले लक्षण आहे. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘केरला स्टोरी’ या चित्रपटांमुळे ‘सत्य घटना समजल्या, वस्तूस्थिती समजली’, असे अनेक जण सांगत आहेत. भारतीय इतिहासात मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांतील प्रत्येक घटनेवर एक चित्रपट बनू शकतो, अशी स्थिती आहे. हे अत्याचार कळले, तरी हिंदु समाज सावध होऊन आगामी काळात त्यांच्यासमोरील धोक्यांविषयी जागृत होऊ शकेल. बंगाल आणि केरळ राज्यांमध्ये तेथील सत्ताधार्‍यांकडून स्थानिक हिंदूंवर असेच आणि याहून अधिक अत्याचार सध्याही चालू आहेत. बंगाल येथून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओद्वारे तेथील अनेक ठिकाणी रोहिंग्या मुसलमान वसलेल्या भागांमध्ये हिंदूंना निवडणुकीचा प्रचार करण्यास जातांनाही त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत, असे समोर आले आहे. थोडक्यात इतिहासातील भयावह घटनांविषयी एवढ्या वर्षांनंतर चित्रपट येणे आणि त्यातून समाजमन जागृत होणे, हा कालमहात्म्याचाच परिणाम आहे. वस्तूस्थिती सांगणारे अधिकाधिक असे चित्रपट येऊन भारतीय हिंदु समाज सचेतन होवो, ही अपेक्षा !

रझाकारी मानसिकतेचे एम्.आय.एम्.सारखे पक्ष भारतात असणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक !