मेदिनीपूर (बंगाल) येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात गुन्हा नोंद !

कोलकाता (बंगाल) – राज्यात असलेल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथून अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते मनोब्रता जाना यांच्या पत्नी मोनी जाना यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. मोनी जाना यांनी आरोप केला की, तपासाचे कारण देऊन यंत्रणेचे अधिकारी त्यांच्या घरात बळजोरीने घुसले. त्यांनी मारहाण, गैरवर्तन, तसेच घराची तोडफोड केली. यावरून बंगाल पोलिसांनी यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. (‘उंदराला मांजराची साक्ष’, याचाच हा प्रकार होय ! – संपादक)

सौजन्य  Amar Ujala

वर्ष २०२२ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या तपासासाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक भूपतीनगरला पोचले होते. तृणमूल काँग्रेसचे नेते बलाई चरण मैती आणि मनोब्रता जाना या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार आहेत. यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी आरोपींना अटक करण्यास आरंभ केला, तेव्हा स्थानिक लोक त्यांच्यासमोर लाठ्या घेऊन उभे राहिले. त्यानी अधिकार्‍यांच्या वाहनावर दगडफेक केली. या आक्रमणात एक अधिकारीही घायाळ झाला आहे. या विरोधाला न जुमानता पोलीस आरोपींना घेऊन कोलकाता येथे गेले. अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी या आक्रमणाच्या विरोधात भूपतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

संपादकीय भूमिका 

तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या बंगालमध्ये याहून वेगळे काय घडणार  ?