The Kerala Story On Doordarshan : केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – दूरदर्शनवर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ एप्रिल या दिवशी रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात आला. या प्रसाराणाच्या निर्णयावर त्यापूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी टीका केली. पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती. हा चित्रपट ५ मे २०२३ या दिवशी देशात प्रदर्शित झाला होता. त्या वेळी राज्यातील साम्यवादी पक्षांनी याचा निषेध केला होता.

१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका करतांना म्हटले की, सार्वत्रिक निवडणुकीमुळे भाजपने वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. केरळ समाजात भगवा पक्ष प्रवेश करू शकला नसल्याने भाजप स्वतःचे राजकीय धोरण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे केरळला आव्हान देण्यासारखे आहे.

२. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा केरळमध्ये प्रचंड निदर्शने झाली होती. सेन्सॉर बोर्डानेच चित्रपटातील १० दृश्ये काढून टाकली होती. केरळ उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी चित्रपटाच्या विज्ञापनामध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नसल्याचे सांगत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

‘द केरला स्टोरी’मध्ये काय आहे ?

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट विविध समाजातील मुलींचे इस्लाममध्ये झालेले धर्मांतर आणि त्यांचा इस्लामिक स्टेटमध्ये समावेश करण्यावर आधारित आहे. हा चित्रपट ४ मुलींच्या जीवनावर आधारित आहे. ४ महाविद्यालयीन तरुणी एका आतंकवादी संघटनेत कशा प्रकारे सामील होतात, हे दाखवण्यात आले आहे.