KK Mohammad On Bhojshala : भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते !

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद

धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते आणि नंतर त्याचे इस्लामिक प्रार्थनास्थळात (मशिदीत) रूपांतर करण्यात आले, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी अधिकारी तथा प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी नुकतीच दिली.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ए.एस्.आय.) भोजशाळा संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करत आहे. विभागाला ६ आठवड्यांच्या आत हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु आणि मुसलमान यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. हिंदु मानतात की, भोजशाळा हे श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर आहे, तर मुसलमान त्याला कमल मौला मशीद म्हणतात.

१. के.के. महंमद पुढे म्हणाले की, भोजशाळेविषयची ऐतिहासिक वस्तूस्थिती अशी आहे की, ते श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते. तिचे मशिदीत रूपांतर करण्यात आले; परंतु ‘पूजास्थळ कायदा १९९१’नुसार धार्मिक स्थळाच्या दर्जाचे आधारभूत वर्ष १९४७ आहे. म्हणजे जर ती वास्तू १९४७ मध्ये मंदिर असेल, तर ते मंदिर राहील आणि जर मशीद असेल, तर ती मशीद राहील.

२. १९७६-७७ मध्ये अयोध्येत प्राध्यापक बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या उत्खनन पथकामध्ये के.के. महंमद सहभागी होते. त्यांनी दावा केला होता की, त्यांनी पहिल्यांदा बाबरी ढाच्याच्या खालीही श्रीराममंदिराचे अवशेष पाहिले होते.

मथुरा आणि काशी यांविषयी मुसलमानांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करावा ! – के.के. महंमद

प्रा. के के महंमद

एका प्रश्‍नाच्या उत्तरात के.के. महंमद म्हणाले की, मथुरा आणि काशी यांविषयी मुसलमानांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे. मथुरा आणि काशी हे हिंदूंसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, जितके मुसलमानांसाठी मक्का अन् मदिना आहेत.   काशी हे भगवान शिवाशी संबंधित आहे आणि मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. हिंदू त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करू शकत नाहीत; परंतु या केवळ मुसलमानांसाठी असलेल्या मशिदी आहेत, ज्यांचा महंमद पैगंबर किंवा ‘औलिया’ यांच्याशी थेट संबंध नाही. त्या मशिदी अन्यत्र स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. दोन्ही समुदायांनी एकत्र बसून या प्रकरणांवर तोडगा काढला पाहिजे.