नागपूर – येथील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात सहस्रो कोंबड्याना ‘बर्ड फ्ल्यू’ आजाराचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. या केंद्रामधील ‘पोल्ट्री फार्म’मध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसांत प्रतिदिन शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यानंतर पशू संवर्धन विभाग सतर्क झाला असून या संबंधित योग्य ती काळजी विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. नियमानुसार संबंधित ‘पोल्ट्री फार्म’च्या १ किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र, तर १० किलोमीटरपर्यंतचा परिसर ‘निगराणी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च या दिवशी आलेल्या अहवालात कोंबड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लूएंझा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले.