अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या घोषणापत्रात प्रथमच हिंदूंसाठी विशेष पान

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक पक्षांकडून त्यांचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळावी; म्हणून दोन्ही पक्षांचे नेते प्रयत्नशील आहेत. या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेतील हिंदु मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये हिंदूंसाठी एक पान ठेवण्यात येणार आहे. या पानावर हिंदूंसाठी करावयाच्या घोषणांचा उल्लेख असेल. असे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाच्या घोषणापत्रात मुसलमान आणि ज्यू यांसारख्या धार्मिक समुदायांसाठी स्वतंत्र पृष्ठ होते. अमेरिकेत अंदाजे ३० लाख हिंदु मतदार आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत घोषणापत्रातील आश्‍वासने पूर्ण करणे कायद्याने आवश्यक आहे. (भारतात वर्षानुवर्षे घोषणापत्रात दिलेली आश्‍वासने एकाही राजकीय पक्ष कधी पूर्ण करत नाही, हा इतिहास आहे. आता भारतातही राजकीय पक्षांना कायद्याने आश्‍वसने पूर्ण करण्याचे बंधन घालणे आवश्यक आहे ! – संपादक)

‘हमासच्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे येथील मुसलमानांचा डेमोक्रॅटिक पक्षाकडे कल अल्प होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत डेमोक्रॅटिक पक्ष हिंदु मतदारांना आकर्षित करू शकतो.’ – श्री. भवानी पटेल, पेनसिल्व्हेनियामधील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार

‘आतापर्यंत अमेरिकेत राजकीय पक्षांकडून हिंदु मतदारांना सार्वजनिक मान्यता नव्हती; मात्र अलीकडच्या काळात अमेरिकी समाजात हिंदूंचा वाढता प्रभाव पहाता आता कोणत्याही पक्षाला हिंदु मतदारांकडे दुर्लक्ष करणे कठीण होणार आहे. अशा स्थितीत घोषणापत्रात हिंदूंसाठी स्वतंत्र पान काढणे योग्य ठरेल.’ – रमेश कपूर, डेमोक्रॅटिक पक्षाचे देणगीदार

अमेरिकेतील ५० पैकी १६ राज्यांमध्ये हिंदु मतदार निर्णायक आहेत. व्हिस्कॉन्सिन, जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान मतदार समान आहेत. 

संपादकीय भूमिका 

अमेरिका कथित धर्मनिरपेक्ष राष्ट्र असले, तरी ते ख्रिस्ती धर्मालाच प्राधान्य देते, हे जगजाहीर आहे; कारण तेथे ख्रिस्ती बहुसंख्य आहेत. भारतात याउलट आहे, म्हणजे बहुसंख्य हिंदूंना कोणतेही महत्त्व नाही. आता हिंदूंची मते मिळवण्यासाठी हिंदूंचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटिक पक्ष करत आहे. यापूर्वी त्याला हिंदूंची आठवण झालेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !