दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला दिलेली सदिच्छा भेट !

१२, १३ आणि १४.९.२०२३ या कालावधीत दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (कथ्थक मधील डॉक्टरेट) (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला सदिच्छा भेट दिली. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीतसमन्वयक आणि संगीत विशारद) यांनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याची ओळख करून दिली. विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी नृत्याच्या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकार्यात सहभाग घेतला. त्यांचे नृत्यसाधनेविषयीचे मनोगत आणि संशोधनासाठी नृत्याचे प्रयोग करतांना त्यांनी अनुभवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(भाग १)

ईश्वरप्राप्तीसाठी नृत्यकला

१. नृत्यसाधना आणि त्याविषयीचे मनोगत

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘साधनेचे प्रयत्न कसे वाढवायला हवेत ?’, याचे आत्मसंशोधन (अंतर्निरीक्षण) करण्यासाठीच  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने येथे आमंत्रित केले असावे’, असे वाटणे : सर्वप्रथम मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक आदरणीय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रणाम करते आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ इच्छिते. ‘कला आणि अध्यात्म यांवर संशोधन करण्यासाठी माझ्यासारख्या कलाकाराला येथे आमंत्रित करणे’, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ‘गेली अनेक वर्षे आम्ही जी कला प्रस्तुत करत आहोत आणि शिकवत आहोत, ‘त्याचे स्वरूप कसे असायला हवे ? आम्ही कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याचे आत्मसंशोधन (अंतर्मुख होऊन कलेकडे साधना म्हणून पहाण्यासाठी) करण्यासाठीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला येथे (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय येथे) आमंत्रित केले असावे’, असे मला वाटते.

१ आ. ब्रह्मदेवाने पाचव्या वेदाची निर्मिती करणे, कालांतराने सर्व कलांचा विकास होणे आणि मंदिरांमध्ये त्याचे प्रस्तुतीकरण होऊन कला समाजप्रबोधनाचे माध्यम बनणे : ‘आजकाल कलाकार कलेची प्रस्तुती ‘आनंद’ आणि ‘व्यवहार’ या दोन्हींसाठी करतो’, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. त्रेतायुगात कलह आणि क्लेश वाढल्यामुळे ब्रह्मदेवाने ‘लोकांना आनंद मिळण्यासह ईश्वरप्राप्तीही करता यावी’, यासाठी चारही वेदांचे स्मरण करून पाचव्या वेदाची (नाट्यशास्त्राची) निर्मिती केली. त्यानंतरच्या कालखंडात विद्वान आणि शास्त्रकार यांनी यांवर पुष्कळ अभ्यास केला. त्यामुळे सर्व कला आपल्या परीने विकसित होत गेल्या. ‘प्राचीन काळापासून ‘अध्यात्म आणि कथ्थक नृत्य’ एकमेकांना जोडलेले आहेत’, हे मी एक कथ्थक नर्तिका म्हणून सांगू शकते. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये कथ्थक नर्तक हे प्रवचन किंवा कथाकथन करून नृत्य प्रस्तुत करून समाजप्रबोधन करत असत.

सौ. रूपाली देसाई

१ इ. ‘ईश्वरप्राप्ती’ हा कलेचा उद्देश पालटून, कलेकडे केवळ एक छंद म्हणून बघितले जाणे : प्राचीन काळापासून ‘ईश्वरप्राप्ती’ हा उद्देश असणार्‍या कला वर्तमान पिढीपर्यंत पोचेपर्यंत त्यांचे स्वरूप पूर्वीसारखे राहिले नाही. मी एक गुरु म्हणून नाही, तर एक शिक्षक म्हणून सांगू शकते, ‘आजकाल जी मुले किंवा त्यांचे पालक माझ्याकडे येतात, ते केवळ अभ्यासाव्यतिरिक्त दुसरा छंद म्हणून नृत्य शिकायला येतात. ‘माझी मुलगी ५ वर्षे नृत्य शिकत आहे. तिच्या २ परीक्षा झाल्या असून तिला त्यातील पदवी प्रमाणपत्र मिळाले आहे’, यातच पालकांना आनंद वाटतो. एवढ्यापर्यंतच आजचे कलेचे शिक्षण सीमित झाले आहे.

१ ई. कलेची वर्तमान दुःस्थिती बघून ‘हे कार्य अपूर्ण राहणार’, असे वाटून मन विषण्ण होणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु जीवनात येऊन, त्यांनी शिष्याला अध्यात्माचा मार्ग दाखवणे : पालक आणि त्यांचे पाल्य यांना कलेचा पुढचा मार्ग दाखवला, तरी त्यांना तो स्वीकारायचा नसतो. एक कलाकार, गुरु आणि शिक्षक म्हणून ही पुष्कळ अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे ‘मी जे करायचा प्रयत्न करत आहे (म्हणजे पालक आणि पाल्य यांना खर्‍या अर्थाने ‘कलेकडे कसे पहायचे ?’, ते सांगणे), ते कधी पूर्ण होणार ?’, असे वाटून ‘मला काही करता येईल’, हा माझा आत्मविश्वास न्यून होऊन ‘माझे कार्य अपूर्णच रहाणार’, असे मला वाटत असतांना अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे परात्पर गुरु शिष्याला (मला) अध्यात्माच्या मार्गावर खेचून आणून हे गुरुकार्य करण्यासाठी उभे करतात अन् त्यासाठी आशीर्वादही देतात. यातून ‘ही सर्व ईश्वरी कृपा आहे’, हे लक्षात येते.

१ उ. श्री गुरूंनी केलेली रचना, पदन्यास, मुद्रा किंवा हावभाव यांत स्वतःहून काही पालट न करता सर्व कृती श्री गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रस्तुत करणे : नृत्य ही प्रयोगात्मक कला (Performing Art) आहे. श्री गुरूंनी जे शिकवले आहे, ‘पदन्यास, मुद्रा, हावभाव’ यांत आम्ही (कलाकार) काहीच पालट करत नाही. सर्वकाही श्री गुरूंनी शिकवल्याप्रमाणेच करतो.  नृत्यगुरु पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांची भगवान श्रीकृष्णावरील नृत्याची रचना प्रस्तुत करतांना मी श्री गुरूंचे (रचनाकारांचे) स्मरण करते. ‘यातील एकही रचना किंवा हावभाव माझ्याकडून सुटू नये’, यासाठी नृत्य करण्याआधी मी त्यांची रचना श्रवण करते आणि त्यांच्या नृत्यातील पदन्यास आठवून नंतर नृत्य प्रस्तुत करते.

१ ऊ. ‘श्री गुरूंना नृत्यातून जे सांगणे अभिप्रेत आहे, त्यात पालट होऊ नये’, यासाठी श्री गुरूंच्या रचनेत मनाने पालट न करणे आणि ‘तसा तो करणे’ हा त्यांच्या उद्देशाचा अपमान वाटणे : गुरु-शिष्य परंपरेने कला पुढे जात असते. नृत्य प्रस्तुती करतांना विद्यार्थी त्यात काही सृजनशील प्रयोग करण्याचा विचार करतील, तर श्री गुरूंनी जो विचार ठेवून त्या रचनेची निर्मिती केली आहे, ती नृत्यरचना, त्यामागील रसनिष्पत्ती, तो भाव आणि त्यातून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने इत्यादी सर्व बिघडू शकतील. त्यामुळे ‘श्री गुरूंनी जे शिकवले आहे, त्याचा अपमान करू नये’, असा माझा विचार असतो.

२ अ. सहस्रावधी प्रेक्षकांमधून एखाद्या रसिकाला दैवी अनुभव येणे आणि त्या रसिकाचे कौतुकाचे बोल ऐकल्यावर ‘कलेच्या प्रस्तुतीकरणाचे सार्थक झाले’, असे वाटणे : ‘कला ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे’, हे वाक्य आपण ग्रंथांमध्ये वाचतो; मात्र ‘ते स्वतः समजून घेणे आणि अन्यांना समजावून सांगणे’, हे अतिशय कठीण कार्य आहे. कला बघणार्‍या सहस्रावधी रसिकांमध्ये एखाद्याच रसिकात सात्त्विक भाव जागृत होऊन, त्याला दैवी अनुभूती येते. असा रसिक आमच्याकडे (कलाकारांकडे) त्याचे अनुभव व्यक्त करतो, तेव्हा आपल्या कलेच्या प्रस्तुतीकरणाच्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटते.’

(क्रमशः)

– सौ. रूपाली देसाई (कथ्थक विद्यावाचस्पती), दादर (मुंबई) (१४.९.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक