मुंबई – इंग्रजी नववर्ष साजरे करण्यासाठी येथील चौपाट्या, हॉटेल्स, बार, दुकाने, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी पहाटेपर्यंत गर्दी असते. घातपात, छेडछाड आदी गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री १३ सहस्रांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाजकंटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आले आहे. एस्.आर्.पी.एफ.्, शीघ्र कृती दल आणि गृहरक्षक दल यांच्याही सैनिकांची गस्त या वेळी असेल. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची, विशेषतः महिला पोलिसांची साध्या वेशात गस्त असेल.
या वेळी मद्य पिऊन वाहन चालवणार्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात येईल. ‘ब्रेथ ॲनालायझर’चा वापर करून मद्यपींची पडताळणी करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास, तसेच ड्रोन आणि आकाशदिवे उडवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
‘कुठेही काही संशयास्पद वस्तू अथवा हालचाली दिसल्यास १०० क्रमांक किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘नागरिकांनी चुकीचे कृत्य घडणार नाही, याची काळजी घ्यावी’, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
ठाणे येथे ५ सहस्र ५०० पोलिसांचा बंदोबस्त
ठाणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – येथे गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या साहाय्याने पोलीस लक्ष ठेवणार आहेत. शहरातील मुख्य चौक, रस्ते, तलाव परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथके आणि नाकाबंदी केली असून ५ सहस्र ५०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मद्यपी वाहनचालक, विनयभंग करणारे, भ्रमणभाषचोर यांच्यावर कडक कारवाई होईल.