ऊसतोडणी यंत्राच्‍या अनुदानासाठी संगणकीय सोडत ! – सहकारमंत्री

दिलीप वळसे-पाटील

नागपूर – राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान निधीची राज्‍यस्‍तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्‍यात  येणार असल्‍याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेत दिली. राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेच्‍या अंतर्गत ऊसतोडणी यंत्रासाठी अनुदान निधी दिला नसल्‍याविषयीचा प्रश्‍न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्‍थित केला होता. त्‍या वेळी ते बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, शेकापचे आमदार जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.

या वेळी वळसे-पाटील म्‍हणाले, ‘‘राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्रांना अनुदान प्रकल्‍पांतर्गत कृषी विभागाच्‍या ‘महाडीबीटी पोर्टल’वर सद्यस्‍थितीत वैयक्‍तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांच्‍याकडून ७ सहस्र ३०० आवेदने प्राप्‍त झाली आहेत. या प्रकल्‍पास वर्ष २०२३-२४ करिता ९६ कोटी ३९ लाख रुपये नियतव्‍यय संमत केल्‍याचे ३ नोव्‍हेंबर २०२३ च्‍या पत्रान्‍वये केंद्र शासनाने कळवले आहे. ऊसतोडणी यंत्रासाठी राज्‍यसरकार एखादी राज्‍यस्‍तरीय योजना आणण्‍याविषयी शेतकरी, साखर कारखानदार, ऊसतोडणी संघटना यांच्‍याशी चर्चा करेल.’’