विकृतीचे समर्थन घातकच !

पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला. पुणे शहरात जाहीरपणे समलिंगी नाते साजरा करणारा असा कार्यक्रम प्रथमच झाला. अनेक निमंत्रित त्यांच्या छोट्या मुलांना घेऊन आले होते. अशा विकृतीचे उघडपणे केलेले प्रदर्शन हे समाजासाठी किती घातक ठरू शकते, याचा विचार या वेळी झाला नाही. अशा ठिकाणी लहान मुलांना नेल्यास त्यांच्यावर काय परिणाम होतील ? त्यांच्या मनात, ‘हे असे चालू शकते’, हा विचार येणार नाही का ? आपल्या देशात आदर्श कुटुंबव्यवस्थेची संस्कृती आहे. त्यामुळे समाज बांधला गेला आहे. समाज संघटित ठेवण्यासाठी समलिंगी विवाहाच्या विकृतीवर योग्य ते उपाय शोधणे आवश्यक आहे. समलैंगिक जीवन जगू इच्छिणार्‍यांवर खरेतर मानसिक आणि आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे. या उपचारांनी हे जीव कदाचित सामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतात. जीवमात्रांचे जीवन सुलभ आणि सुखी होण्यासाठी निसर्गनियमांचे पालन करणे हिताचे असते. समलैंगिकता ही संकल्पना मुळातच निसर्गाच्या विरुद्ध आहे. मानवेतर कोणत्याही प्राणीसृष्टीत असा प्रकार आढळत नाही.

हिंदु धर्मात विवाह हा एक ‘संस्कार’ आहे. ‘सुयोग्य मुलाला जन्म देऊन समाज आणि राष्ट्र यांची उन्नती करणे’, हा या विधीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे लैंगिकता संयमित रहाण्यास साहाय्य होत असते. या विधीचा उद्देशच जर समलिंगी विवाहात साध्य होत नसेल, तर अशा विवाहाला काय अर्थ आहे ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये देशभरातील ३१८ तज्ञांची मते नोंदवण्यात आली. यामध्ये आधुनिक विज्ञानापासून ते आयुर्वेदापर्यंत ८ वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या अभ्यासकांचा समावेश आहे. या तज्ञांनी ‘‘समलैंगिकता एक विकृती असून यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतील, या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात असले प्रकार वाढीस लागतील’’, असे म्हटले आहे. समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची ‘एका पासून अनेक होण्याची’ मूळ इच्छा पूर्ण करू शकत नाही. समलैंगिकतेला प्रोत्साहन देणे, हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, विनाशाच्या मार्गाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करण्यासारखे आहे. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास मानवी समाजाच्या नैसर्गिक सृष्टीचे चक्र बिघडेल, यात शंका नाही !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे