विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन विकास प्रकल्प राबवल्यास भारताचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !
देवभूमी उत्तराखंड येथील उत्तरकाशी येथे १२ नोव्हेंबर या दिवशी सिल्कियारा बोगद्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या ४१ कामगारांची १७ दिवसांनी सुटका झाली. अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या या घटनेतील कामगारांना बाहेर काढण्यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बचावकार्यांतर्गत विविध आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केलेले खोदाईचे काम असो, कामगारांना खाण्या-पिण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे असो, तसेच या जीवघेण्या घटनेतून वाचण्यासाठी त्यांची मानसिक स्थिती कणखर रहाण्यासाठीचे प्रयत्न असोत अन् सर्व यंत्रणा अपयशी ठरल्यावर ‘रॅट मायनर्स’ कामगारांनी (उंदरांप्रमाणे अल्प जागेत खोदकाम करण्याचे विशिष्ट कौशल्य असलेले कामगार) हाताने खोदाई करून कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढणे असो. या प्रत्येकच ठिकाणी सर्व संबंधित यंत्रणांनी उत्तम प्रकारे काम पार पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोगदातज्ञ अर्नाेल्ड डिक्स यांना ऑस्ट्रेलियाहून बोलावण्यात आले होते. या साहाय्यकार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. अर्नाेल्ड डिक्स यांचा सिल्कियारा बोगद्याच्या प्रवेशद्वारापाशी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या छोट्या मंदिरात पूजा करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्यामुळेही ते अधिक चर्चेत आले. पुढे काही दिवस यासंदर्भात सामाजिक माध्यमांवर अनेक विषयांच्या चर्चा झाल्या, लेख प्रसिद्ध झाले, आपद्ग्रस्तांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, साहाय्यकार्यातील कामगारांचे कौतुकही झाले; परंतु संबंधित घटनेच्या खोलात गेल्यावर आध्यात्मिक दृष्टीकोनातून लक्षात आलेली काही सूत्रे येथे देत आहे.
१. विकासासह धार्मिक गोष्टींनाही प्राधान्य हवे !
प्रत्येकच देश राष्ट्राचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो; पण धार्मिक गोष्टींना डावलून केलेले विकास प्रकल्प कालांतराने निष्फळ ठरतात अथवा काही दुर्घटना घडून गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. देवावर विश्वास नसणार्या, केवळ विज्ञानालाच सर्वश्रेष्ठ समजणार्या आणि स्वत:च्या बुद्धीवर विश्वास ठेवून अधर्माचे तुणतुणे वाजवणार्या पुरोगाम्यांना ही गोष्ट पचनी पडणे शक्य नसले, तरी श्रद्धावान सर्वसामान्य व्यक्ती मात्र ही गोष्ट निश्चित मान्य करते; कारण त्याचा प्रत्यय तिने कधी ना कधी घेतलेला असतो. धार्मिक आस्था अन् विश्वास यांमुळे तिची देवावर दृढ श्रद्धा असते. उत्तरकाशी येथील बोगदा दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही गोष्टींतून हीच गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते.
२. स्थानिक देवतेचे मंदिर पाडल्याने दुर्घटना (?)
जेव्हा सिल्कियारा येथील बोगद्याचे काम चालू झाले, तेव्हा तेथे बांधकाम करणार्या आस्थापनाने बाबा बौखनाग देवतेचे मंदिर पाडले होते. वर्ष २०१९ मध्ये जेव्हा या बोगद्याच्या कामाला प्रारंभ झाला, तेव्हाच संबंधित बांधकाम आस्थापनाने ‘मंदिर पुन्हा बनवू’, असे सांगितले होते. स्थानिक लोकांनी आस्थापनाला अनेकदा याची आठवण करून देऊनही एकाही अधिकार्याने त्याची गांभीर्याने नोंद घेतली नाही. शेवटी बोगद्याचा काही भाग कोसळून कामगार अडकण्याची दुर्घटना घडली. बाबा बौखनाग, म्हणजे सिल्कियारासह परिसरातील ३ पट्ट्यांची प्रमुख देवता म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या आत नागराजाची मूर्ती आहे. बाबा बौखनाग हे या भागाचे संरक्षक असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा ‘देवतेचा प्रकोप आहे’, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
३. कामगारांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना अपयश; पण आध्यात्मिक मार्ग अवलंबल्यावर अडचणी दूर !
दुर्घटनेनंतरच्या साहाय्यकार्यासाठी अमेरिकेहून आणलेले अत्याधुनिक ऑगर यंत्र खोदाई करतांना पाते अडकल्याने नादुरुस्त झाले. विविध अत्याधुनिक यंत्रणा वापरूनही प्रत्येक वेळी नवे आव्हान उभे ठाकत असल्याने कामगारांपर्यंत पोचण्यास अडचणी येत होत्या. ‘कामगारांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न अपयशी होत आहेत’, हे लक्षात आल्यावर संबंधित बांधकाम आस्थापनाने सिल्कियारा बोगद्याच्या तोंडावर बाजूला तात्पुरते मंदिर बनवले. बांधकाम आस्थापनातील अधिकार्यांनी मंदिराच्या पुजार्यांशी संपर्क करून क्षमा मागितली. बाबा बौखनाग यांचे स्थान असलेल्या भाटिया गावात जाऊन अधिकार्यांनी मंदिरातील पुजार्यांची भेट घेतली आणि कामगारांना वाचवण्यासाठीच्या साहाय्यकार्याला यश येण्यासाठी त्यांना पूजा करण्यास सांगून प्रार्थना केली. त्या वेळी पुजार्यांनी ‘३ दिवसांत बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका होईल’, असे सांगितले होते. प्रत्यक्षातही ३ दिवसांनी साहाय्यकार्याला यश येऊन कामगारांची सुटका झाली.
४. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगदातज्ञ नतमस्तक झाले !
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगदातज्ञ (टनेल एक्सपर्ट) ऑस्ट्रेलियाचे अर्नाेल्ड डिक्स यांना भारत सरकारने बोगदा दुर्घटनाग्रस्तांच्या साहाय्यकार्यासाठी सल्लागार म्हणून बोलावले होते. ते प्रतिदिन बोगद्याबाहेर तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या बाबा बौखनाग यांच्या मंदिरात नतमस्तक होऊन कामगारांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी प्रार्थना करत होते. एका विदेशी व्यक्तीला अशा कठीण प्रसंगी स्थानिक देवतेचे महत्त्व लक्षात येणे आणि तिने देवतेच्या चरणी शरण जाऊन कामगारांच्या सुटकेसाठी मनोभावे प्रार्थना करणे, हे सध्याच्या विज्ञानयुगात विज्ञानाची मर्यादा स्पष्ट करण्यासह अध्यात्माची श्रेष्ठता सिद्ध करणारे आहे.
कामगारांच्या सुटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना अर्नाेल्ड डिक्स म्हणाले, ‘‘मला बोगद्याच्या बाहेर असलेल्या मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील. कामगारांची सुखरूप सुटका होणे, हा चमत्कारच आहे. जे काही घडले, त्याचे आभार मानण्याचे मी वचन दिले आहे.’’ डिक्स पुढे म्हणाले, ‘‘तुम्हाला आठवत आहे का ? मी तुम्हाला म्हटले होते की, हे कामगार नाताळपर्यंत बाहेर येतील. कुणालाही कसलीही दुखापत होणार नाही. नाताळ जवळ येत आहे. आम्ही बचावाचे काम करतांना शांत होतो. ‘पुढची वाटचाल कशा पद्धतीने करायची ?’, याविषयी आम्ही स्पष्ट होतो. एक पथक म्हणून आम्ही उत्तम काम केले. भारतात जगातील उत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा मी एक भाग होतो, याचा मला आनंद आहे.’’
कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांनी या कालावधीत भारतात मिळालेल्या शाकाहारी पदार्थांचेही कौतुक केले. उच्चपदावर कार्यरत असलेल्या विदेशी व्यक्तीची हिंदु देवतांप्रतीची श्रद्धा, भारतीय आणि येथील संस्कृती यांविषयी त्यांना वाटलेली आपुलकी, तसेच त्यांनी केलेले कौतुक हे भारतियांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे !
५. बोगदा दुर्घटनेविषयी लक्षात आलेली काही सूत्रे
५ अ. धार्मिक दृष्टीकोनातून उत्तराखंड राज्याचे महत्त्व ! : उत्तराखंड ही देवभूमी आहे. अनेक धार्मिक ग्रंथांतही याचा वेळोवेळी उल्लेख केला आहे. अनेक अवतारांनी येथे जन्म घेतला आहे. ऋषिमुनींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. केदारनाथ, ब्रदीनाथ यांसारखे प्रमुख चारधाम याच राज्यात आहेत. हरिद्वार, ऋषिकेश यांसारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे असून गंगा-यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगमही याच राज्यात झाला आहे. वर्षभरात लाखो भाविक येऊन येथे मंदिरांचे दर्शन घेत असतात. त्यामुळे उत्तराखंडचे धार्मिक दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा सात्त्विक वातावरणात रहायला मिळणे हे तेथे रहाणार्या लोकांचेही भाग्य आहे.
५ आ. स्थानिक देवतेप्रतीचा भाव : उत्तराखंडमध्ये कुठलाही नवीन पूल, रस्ता किंवा बोगदा बांधण्यापूर्वी स्थानिक देवतेचे छोटे मंदिर बांधण्याची प्रथा आहे. ‘मंदिरातील देवतेचा आशीर्वाद घेतल्यानंतरच काम पूर्ण होते’, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे सिल्कियारा येथील बोगद्याचे बांधकाम चालू करण्यापूर्वी संबंधित बांधकाम आस्थापनाने स्थानिक देवता बाबा बौखनाग यांचे मंदिर पाडून मोठी चूक केल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली होती.
५ इ. विकासकामे करतांना धार्मिकतेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी ? : काही विकसित देशांत विविध इमारतींना जोडणारे उड्डाणपुलाच्या स्वरूपातील रस्ते, मेट्रोरेल इत्यादींचे बांधकाम करतांना त्या प्रकल्पग्रस्तातील काही लोकांनी आपली भूमी देण्यास विरोध केल्याने त्या वास्तूला धक्का न लावता पर्याय काढून मार्ग बनवल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. जिथे विदेशासारख्या ठिकाणी आणि तेही माणसांनी आक्षेप घेतलेल्या प्रकरणी संबंधित बांधकाम आस्थापन एवढी तडजोड करत असेल, तर भारतासारख्या धार्मिक देशात एखाद्या देवतेचे मंदिर प्रकल्पासाठी पाडले जाणे दुर्दैवी आहे.
खरेतर मोठे बांधकाम प्रकल्प राबवतांना त्या क्षेत्रात येणार्या लोकांसाठी पर्यायी उपाययोजना सरकारकडून गेली जाते. संबंधित क्षेत्रातील लोकांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून देऊन संबंधितांचे स्थलांतर करणे इत्यादी केले जाते. सरकारने केवळ यावरच न थांबता संबंधित क्षेत्रातील मंदिरे, तसेच अन्य धार्मिक स्थाने यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. काही कारणास्तव असे कुठले स्थान पाडावे लागणार आहे ? धर्मशास्त्रानुसार कसे करायला हवे ? याचे शास्त्र धार्मिक क्षेत्रात्रील उन्नत व्यक्तींकडून समजून घेऊन मंदिरांची पुनर्स्थापना करावी आणि त्यानंतरच बांधकाम चालू करायला हवे.
५ ई. धर्मशास्त्र आणि वास्तूशास्त्र यांनुसार केले जाणारे बांधकाम ! : भारतात विविध राज्यांत धर्मशास्त्रानुसार आणि वास्तूशास्त्रानुसार बांधलेली अनेक सुप्रसिद्ध अन् भव्यदिव्य पुरातन मंदिरे आहेत. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे मंदिरे किंवा कुठलेही बांधकाम करतांना त्यासाठी वास्तू निवडण्यापासून तिचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्याला धर्मशास्त्रानुसारच सर्व कामे केली जात. त्यामुळे बांधकाम परिपूर्ण आणि उत्कृष्ट होण्यासह त्याला देवतांचे आशीर्वाद लाभल्याने ते कित्येक वर्षे टिकायचे. तेथे देवता-ऋषिमुनी, साधू-संत यांचा सहवास असल्याने वास्तू आणि तेथील परिसरात चांगली स्पंदने निर्माण होऊन त्यांचा लाभ सर्वांनाच व्हायचा. याउलट आताच्या आधुनिक काळातील बांधकामे पाहिली, तर कधी कुठले बांधकाम कोसळेल, रस्ते किती कालावधी टिकतील, हे सांगता येत नाही अथवा त्यासंदर्भात निश्चिती देता येत नाही. संबंधित कामे करतांना होणारे घोटाळे, भ्रष्टाचार यांमधून साधल्या जाणार्या स्वार्थामुळे त्या वास्तूतील स्पंदनेही चांगली नसतात.
६. धार्मिक अधिष्ठान असलेले कार्य यशस्वी होते, हे लक्षात घेऊन कृती करणे आवश्यक !
सध्याच्या आधुनिक विज्ञानयुगात व्यक्ती स्वत:चा भौतिक विकास साधण्याकडेच अधिक लक्ष देत आहे. प्रचंड लोकसंख्यावाढीमुळे लोकांच्या सुविधेसाठी निसर्गावर आघात करून केलेले विकासप्रकल्प राबवले जात आहेत. केवळ भौतिक विकासाला प्राधान्य दिल्याने तो क्षणिक सुखदायी होत आहे. अधर्माचरणामुळे व्यक्ती स्वत:चे मानसिक आरोग्य, स्थैर्य आणि आनंद गमावत आहे.
उत्तराखंडमध्ये काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे झालेली हानी आपण अनुभवली आहे. तेथे वेळोवेळी होणार्या भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे भीषण परिणामही आपण पाहिले आहेत. आता उत्तराखंडातीलच सिल्कियारा येथील बोगदा दुर्घटनेतून तरी शिकून सरकारने धडा घ्यायला हवा आणि कुठलेही विकासप्रकल्प राबवतांना मंदिरे पाडण्यासारखे पाप न करता धार्मिक गोष्टींना प्राधान्य देऊन धर्मशास्त्रानुसार सर्व कामे करायला हवीत. भगवंताचे अधिष्ठान असलेले कार्यच यशस्वी होते आणि निर्विघ्नपणे पार पडते, हेच यातून लक्षात येते !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१२.२०२३)