नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – ४ वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागातील भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आणि ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली, त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याचा शासन निर्णय झाला आहे. विविध माध्यमांतून त्याची प्रसिद्धी केली जात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक दिल्यावर लगेच त्यांच्या खात्यांवर पैसे पाठवण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य प्रा. राम शिंदे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, जयंत पाटील यांनी भाग घेतला.
वर्ष २०१९ मध्ये १३ सहस्र ५२१ पदांसाठी ३४ जिल्हा परिषदांमध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली; मात्र विविध कारणांनी भरती प्रक्रिया रेंगाळली. भरतीसाठी परीक्षा शुल्कापोटी घेण्यात आलेले ३३ कोटी रुपये त्या त्या विभागांकडे आणि ग्रामविकास विभागाकडे जमा झाले; मात्र ४ वर्षे होऊनही विद्यार्थ्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने परीक्षेसाठी अर्ज करतील, त्यांचे शुल्क न घेण्याचे प्रावधान करावे. यात ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सदस्य प्रा. राम शिंदे यांनी केली.