Bhide Guruji : अयोध्या येथील ५ एकर भूमी मुसलमानांच्या मशिदीसाठी देण्याचा निर्णय दुर्दैवी !

  • पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन !

  • मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ !

  • सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना

सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने थाटामाटात केलेल्या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला ‘शून्य’ अर्थ प्राप्त होणार आहे. मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना भूमी द्यायचीच कशाला ? या निर्णयामुळे आम्हाला दुःख झाले असून अयोध्या येथील ५ एकर भूमी देण्याचा निर्णय रहित करावा, त्या भूमीवर मशीद बांधली जाऊ नये, अशीच हिंदूंची मागणी आहे, असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले.

नवरात्रोत्सवानिमित्त १६ ऑक्टोबरपासून चालू झालेल्या श्री दुर्गामाता दौडीचा सांगता समारंभ २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता येथील शिवाजी पुतळ्यासमोर भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. या वेळी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

दौडीत सहभागी झालेले धारकरी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,

१. ‘अयोध्या येथे ५ एकर भूमीत जगातील सर्वांत मोठी मशीद बांधण्यात येणार असून त्यासाठी तेथे महाराष्ट्रातील वीट देण्यात येईल’, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले आहे. मग हिंदूंनो, या मशिदीसाठी महाराष्ट्रातून वीट जाऊ देणार का ? असे कदापि होता कामा नये.

२. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर अयोध्या येथे मशीद बांधण्याच्या निर्णयाच्या विरोधात ते सुडाने पेटून उठले असते. ते आता नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले हेवेदावे विसरून हिंदु धर्मरक्षणार्थ कार्य केले पाहिजे.

३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्या प्रती जी आस्था होती, ती हिंदूंमध्ये नाही. अशी आस्था हिंदूंमध्ये निर्माण झाली पाहिजे.

४. श्रीकृष्ण आणि पांडव यांनी कौरवांना संपवण्याची शपथ घेतली होती, तसेच सध्या इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. यातून हिंदूंनी बोध घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कार्य केले पाहिजे.

गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे धारकर्‍यांना आवाहन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हिंदूंचे अनुक्रमे १३ वे आणि १४ वे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र वढू बूद्रुक ते श्रीक्षेत्र रायगड अशी गडकोट मोहीम काढण्यात येणार आहे. तरी यामध्ये धारकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

क्षणचित्रे…

१. दौडीत अग्रभागी असलेला भगवा ध्वज, धारकर्‍यांनी परिधान केलेले भगवे फेटे आणि शिस्तबद्ध रितीने मार्गक्रमण करणारे धारकरी हे दुर्गादौडीचे आकर्षण ठरले.

२. ‘जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

३. शहरातील सर्व रस्त्यांवर भगवे ध्वज आणि पताके लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

४. श्री दुर्गामाता दौडीसाठी ४ सहस्रांहून अधिक धारकरी आणि शिवप्रेमी यांची उपस्थिती होती.

५. या वेळी शहरातील मारुति चौक, गावभाग आदी ठिकाणी दौडीतील भगव्या ध्वजाला हार घालून आणि औक्षण करून स्त्रियांनी स्वागत केले.

६. शहरात ठिकठिकाणी संस्कार भारतीच्या वतीने विविध रंगांमधील सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.