श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्‍यावर असतांना अडचणी आपोआप सुटणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. सेवेसाठी दौर्‍यावर असल्याने घरातील सामान नवीन घरात नेण्यासाठी घराजवळील साधकांनी साहाय्य करणे आणि स्थानांतर सहजतेने होणे अन् याचे नातेवाइकांना आश्‍चर्य वाटणे

‘१७.५.२०२१ या दिवशी मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्‍यावर गेलो होतो. आमच्या घरी आई आणि बहीण रहात होत्या. एकदा त्यांना घर पालटायचे होते. माझ्या मनात ‘मी सेवेसाठी दौर्‍यावर असल्यामुळे ‘घरातील सामान नेण्यासाठी त्यांना वेळ कसा देऊ ?’, असा विचार येत होता. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीकाकू म्हणाल्या, ‘‘तू देवाची सेवा करतो आहेस, तर देव तुझ्या सर्व अडचणी दूर करील.’’ नंतर त्यांनी सांगितले, ‘‘आई रहाते, त्या ठिकाणी कुणी साधक रहातात का, ते पहा. ते साहाय्य करतील.’’ चौकशी केल्यावर समजले की, आम्ही आता रहातो, त्या घराजवळ आणि आम्ही रहायला जाणार, अशा दोन्ही ठिकाणी साधक रहातात. त्यांना विचारल्यावर ते आईला साहाय्य करायला तयार झाले. दुसर्‍या दिवशी साधकांनी घरातील साहित्य गाडीत भरून नवीन घरात पाठवून दिले. नवीन गावातील साधकांनी येऊन गाडीतील सर्व साहित्य उतरवून घेतले आणि साहित्य जागेवर लावून दिले. हे सर्व श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीकाकू यांनी सांगितल्याप्रमाणेच घडले.

आमचे नातेवाईक आईला म्हणायचेे, ‘‘तुमचा मुलगा नेहमी सेवा-सेवा करत असतो. त्याला ‘घरातील सामान न्यायला आणि लावायला बोलवा.’’ घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्‍चर्य वाटले.

श्री. विनीत देसाई

२. आईला कोरोना झाल्याचे समजल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आईची काळजी घ्यायला घरी जाण्यास सांगून आईसाठी नामजपादी उपाय विचारून घेण्यास सांगणे अन् तसे केल्यावर आई बरी होणे

मी कोरोना महामारीच्या काळात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीकाकूंसह रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हा ‘आईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, असे मला समजले. त्या वेळी मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीकाकूंनी आईची काळजी घेण्यासाठी घरी जाण्यास सांगितले. त्यांनी मला स्वतःजवळील विभूती दिली आणि सांगितले, ‘‘आईला प्रतिदिन ही विभूती लाव अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्याकडून आईसाठी नामजपादी उपाय विचारून घे. सर्व ठीक होईल.’’ घरी गेल्यावर माझे सर्व नातेवाईक म्हणत होते, ‘‘तुझ्या मावशीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तुझी आई मावशीजवळच रहात होती. त्यामुळे तिलाही कोरोना झाला. आता काहीही होऊ शकतेे.’’ मी आईला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीकाकूंनी दिलेली विभूती लावण्यास सांगितली आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप करू लागलो. त्यानंतर आईची प्रकृती सुधारली आणि रुग्णालयातून आईला १० दिवसांत घरी आणले. तेव्हा नातेवाइकांनाही आश्‍चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या गुरूंनी आईची काळजी घेतली आणि ती बरी झाली. माझ्या मोठ्या मावशीचा मी पूर्ण वेळ साधना करण्यास विरोध होता; पण वरील प्रसंगानंतर आता तिचाही विरोध उणावला आहे.’

– श्री. विनीत देसाई, सनातन आश्रम, रामानथी, गोवा. (८.१२.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक