जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नागपूर – आजही समाजात भेदभाव पाळला जातो. मंदिरात प्रवेश दिला जात नाही. नोकर्‍यांमध्ये लपून जातीभेद पाळला जातो. घोड्यावर चढला म्हणून चाबकाने मारले जाते, हे सामाजिक वास्तव आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव राहील, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ६ सप्टेंबर या दिवशी रवीनगर येथील श्री अग्रसेन छात्रवासतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात सामाजिक विषमतेचा इतिहास आहे. एका समाजाला पशूसारखे वागवले गेले. बिकट परिस्थिती होती, ती २ सहस्र वर्षे टिकली. त्यांना आपल्यासमवेत आणण्यासाठी उपाय करावे लागतील. त्यातील एक उपाय ‘आरक्षण’ हा होय.

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.