‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते. सख्खे बहीण-भाऊ असतील अथवा चित्तात ज्याच्याप्रती भावाचा किंवा बहिणीचा भाव असेल, ते हे पर्व साजरे करतात. जर चित्तात शुद्ध आणि चांगल्या भावना नसतील, तर राखी केवळ एक धागा बनून रहाते. जर चांगली, पवित्र, दृढ आणि सुंदर भावना असेल, तर तोच नाजूक धागा मोठे चमत्कार घडवतो. यातून ऋषींनी किती सखोल अध्ययन केले असेल, ते दिसून येते. जीवनाच्या मौल्यवान क्षणांना, ऊर्जेला आणि दृष्टीला खालच्या स्तराकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी रक्षाबंधनाचा उत्सव मोठे साहाय्य करतो.
१. निरपेक्ष भावाने राखी बांधणारी बहीण म्हणजे साक्षात् श्री लक्ष्मीदेवी !
बहिणीने निरपेक्षपणाने भावाच्या हाताला राखीचा धागा बांधतांना भावना करावी, ‘माझा भाऊ ओजस्वी, यशस्वी आणि तपस्वी होवो. स्वतःही (भवसागर) तरून जावो आणि इतरांनाही तारणारा होवो.’ अशी भावना करून जर बहीण राखी बांधत असेल, तर खरोखरच ती बहीण नाही, साक्षात् श्री लक्ष्मीदेवी आहे.
२. रक्षाबंधनाच्या धाग्याचे महत्त्व
मनोवैज्ञानिक तथ्य आहे की, एखाद्या प्रती तुम्ही जसे विचार करता, त्याच्या मनातही तसेच विचार उत्पन्न होतात. बहीण जर भावासाठी शुभ कामना करत असेल, तर भावाच्या चित्तातही प्रसन्नता, उदारता, सहानुभूती आणि सत्कामनांची प्रक्रिया होते. दुसरे काही बांधत असाल, तर होऊ शकते की, त्याचे तुकडे तुकडे होतील; पण या धाग्याचे तुकडे तुकडे होत नाहीत. धागा दिसतो पातळ आणि नाजूकसा; परंतु यात मोठी शक्ती दडलेली आहे.
३. रक्षाबंधन दिवस बहीण-भावाला दायित्वाचे स्मरण करून देणारा !
बहिणीचे भगिनीत्व तोपर्यंत आहे, जोपर्यंत ती ‘भावाचे कल्याण होवो, ओज, बळ, तेज आणि ज्ञान वाढत राहो’, या कामनेने भावाला राखी बांधते आणि भाऊ तेव्हाच भाऊ आहे, जेव्हा तो ‘बहिणीच्या जीवनाचे, शील, चारित्र्याचे अन् बहिणीच्या दुःखात धावून जाण्याचे दायित्व माझे आहे’, असे मानत असेल. या दायित्वाचे स्मरण करवून देण्याचा दिवस आहे रक्षाबंधन !
४. आध्यात्मिकदृष्ट्या एकमेकांना साहाय्य करणारे बहीण-भाऊ गुरुतत्त्वाच्या प्राप्तीचे अधिकारी !
बहिणीने केवळ भावाकडून बाह्यरक्षणासाठीच त्याला राखी बांधू नये आणि भावाने केवळ बहिणीच्या बाह्यसुविधांचीच काळजी घेऊ नये, तर बहीण गार्गीसारखी व्हावी आणि भाऊ जनकासारखा व्हावा. ‘बहीण तत्त्वज्ञानाला उपलब्ध व्हावी, सुख-दुःखात सम रहावी, लाभ-हानी आणि जीवन-मृत्यू यांना खेळ समजून जीवन-मृत्यूच्या पार जो परमात्मा आहे, त्यात जागृत व्हावी’, असे ज्ञान बहिणीला भाऊ मिळवून देण्यात जर साहाय्य करत असेल, तर खरोखर तो भाऊ भगवंताचे रूप आहे. जर तुमची दृष्टी भावाला भगवंताचे रूप मानणारी अशी बनली आहे आणि अशा दृष्टीची जर तुम्ही एकमेकांसाठी कामना करत असाल, तर तुम्ही केवळ भाऊ-बहीण नसून गुरुबंधू -गुरुभगिनी सुद्धा आहात अन् गुरुतत्त्वाच्या प्राप्तीचे अधिकारी सुद्धा आहात.’
(साभार : मासिक, ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०२०)