‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, या भावाने प्रत्‍येक कर्म आणि व्‍यवहार करणे, म्‍हणजे खरे ‘रक्षाबंधन’ !

रक्षाबंधन विशेष

आज ३० ऑगस्‍ट या दिवशी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ या मंगलप्रसंगी तिच्‍या सर्वांगाने रक्षणासाठी कटीबद्ध होतो. तसेच या वेळी  बहीणही भावासाठी ‘येन बद्धो बली राजा दानवेन्‍द्रो महाबलः । तेन त्‍वामपि बध्‍नामि रक्षे मा चल मा चल ॥ (अर्थ : महाबली आणि दानवेन्‍द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्‍या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.), अशी प्रार्थना करते. अशा या रक्षाबंधनाचा अर्थ, त्‍या दिवशी करावयाचा संकल्‍प आणि त्‍या अंतर्गत केल्‍या जाणार्‍या कृतींचा भावार्थ येथे देत आहोत.

१. मानवाचे विकारांपासून रक्षण होण्‍याची आवश्‍यकता असणे

‘रक्षासूत्र पर्वाचे दुसरे नाव ‘रक्षाबंधन’, असे आहे. रक्षाबंधन म्‍हणजे असे बंधन, जे रक्षण करते. आता प्रश्‍न पडतो, ‘रक्षण कुणापासून व्‍हायला पाहिजे ? आज ना जंगली प्राण्‍यांचे भय आहे, ना आक्रमकांचे, ना कंस, रावण इत्‍यादी राक्षसांचे, तर मग रक्षण कुणापासून व्‍हायला पाहिजे ?’ आपल्‍याला ‘निर्लज्‍जपणा, काया-माया (चमडी-दमडीचे) यांचे आकर्षण, स्‍वैराचार, द्वेष, अविश्‍वास, भय, काम, क्रोध, अहंकार’ इत्‍यादी शत्रूंपासून रक्षण हवे आहे.

ब्रह्माकुमारी उर्मिला

२. रक्षाबंधनानिमित्त आपल्‍या प्रेमाची व्‍याप्‍ती वाढवत जाणे आवश्‍यक !

सीमित प्रेमातूनच कामाची निर्मिती होते. जर माणसाची कामना पूर्ण झाली नाही, तर त्‍यातून क्रोध उत्‍पन्‍न होतो. वस्‍तूंच्‍या आसक्‍तीमुळे लोभ निर्माण होतो. कुटुंबाप्रतीच्‍या प्रेमातून मोह निर्माण होतो. अशा विकृत प्रेमाला निर्मळ करण्‍यासाठी ‘आत्‍मभाव’ असणे आवश्‍यक असतेे.

‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, म्‍हणजे ‘संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब आहे’, या भावाने प्रत्‍येक कर्म आणि व्‍यवहार करावा. हेच आहे ‘रक्षाबंधन’ ! जर आपण प्रत्‍येक रक्षाबंधनानिमित्त आपल्‍या प्रेमाची व्‍याप्‍ती वाढवत गेलो, तर एक दिवस संपूर्ण विश्‍वच आपल्‍या प्रेमाच्‍या व्‍याप्‍तीमध्‍ये सामावून जाईल.

३. काही ठिकाणी ‘रक्षाबंधन’ हा सण पैसा आणि भेटवस्‍तू यांपुरता मर्यादित असणे

आज तर ‘रक्षाबंधन’ हा सण एवढा क्षुल्लक झाला आहे की, या सणाला केवळ भावाकडून बहिणीला काही पैसे किंवा भेटवस्‍तू देण्‍याचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी तर हा पैसा आणि भेटवस्‍तू प्रेम वाढवण्‍याऐवजी भांडण-तंटे होण्‍यास कारणीभूत ठरतात.

४. राखीचा धागा मर्यादा, पावित्र्य आणि प्रतिज्ञा यांचे प्रतीक असणे

रक्षाबंधनाच्‍या शुभदिनी बहीण भावाच्‍या मनगटावर एक धागा बांधते. आजकालच्‍या रंगीबेरंगी राख्‍या हे या शुभदिनाचे आधुनिकीकरण आहे, उदा. नित्‍यस्‍मरणीय ‘रामायण’ ग्रंथात सांगितले आहे, ‘सीता गवताच्‍या एका काडीच्‍या आधारे रावणासारख्‍या राक्षसाचा कोप आणि हिंसा यांपासून स्‍वतःचे रक्षण करू शकली.’ ती गवताची काडी धर्म, सीतेचे अखंड ब्रह्मचर्य आणि सतीत्‍व यांचे प्रतीक होती. अशाच प्रकारे मनगटावर बांधलेला हा धागासुद्धा मर्यादा, पावित्र्य आणि प्रतिज्ञा यांचे प्रतीक आहे.

५. विकाररहित पवित्र जिवाने दुसर्‍याच्‍या मनगटावर बांधलेला धागा काम, क्रोध आणि लोभ यांवर शस्‍त्रासारखा कार्य करत असणे

तसे पहाता गवताच्‍या काडीमध्‍ये स्‍वतःचे बळच नसते; परंतु जेव्‍हा सीतेसारख्‍या सामर्थ्‍यशाली स्‍त्रीने ती हातात धरली, तेव्‍हा तीच गवताची काडी शक्‍तीशाली बनली. त्‍याप्रमाणेच या धाग्‍यामध्‍ये स्‍वतःचे काहीच बळ नसते; परंतु ज्‍याने विषय-वासनांवर नियंत्रण मिळवले असेल, ज्‍याच्‍या मनावर क्रोधाची काळीमा नसेल, लोभाची दलदल नसेल, मोहाचा अंधार नसेल, अहंकाराचे आवरण नसेल, ईर्ष्‍या, द्वेष आणि इच्‍छा यांचा चिखल नसेल, अशा एखाद्या पावन जिवाने दुसर्‍याच्‍या मनगटावर हा धागा बांधला, तर तो धागा कामांतक (काम नष्‍ट करणारा), क्रोधांतक (क्रोधाचा अंत करणारा) आणि लोभांतक (लोभाचा अंत करणारा) शस्‍त्रासारखा कार्य करतो.

६. राखीचा रेशमी धागा, म्‍हणजे परमात्‍म्‍यासमोर केलेली एक प्रकारची पवित्र प्रतिज्ञाच !

हा धागा बांधणारा तर आधीच प्रतिज्ञाबद्ध आहे आणि बांधून घेणारासुद्धा त्‍या प्रतिज्ञेमध्‍ये मर्यादाबद्ध होतो. तो दृढ संकल्‍प करतो, ‘कोणत्‍याही परिस्‍थितीत धाग्‍याच्‍या मर्यादेला मलीन होऊ देणार नाही. आत्‍म्‍यामध्‍ये कोणत्‍याही मनोविकाराचा संकल्‍पसुद्धा प्रवेश करू देणार नाही. मनाच्‍या सर्व प्रवेशद्वारांवर, म्‍हणजे सर्व इंद्रियांवर दृष्‍टी ठेवून मनाला कमळासारखे विकारांच्‍या चिखलापासून दूर ठेवीन.’

मनातल्‍या मनात पुनःपुन्‍हा ही प्रतिज्ञा घोकत राहिले की, ती दुर्दम्‍य मनोबळ देण्‍याचे कार्य करते; कारण मन त्‍यामध्‍ये व्‍यस्‍त रहाते आणि विकार अन् निरर्थक विचार यांपासून मनाची सुटका आपोआपच होते. मनगटावर बांधलेल्‍या या लहानशा बंधनाचा अर्थ आहे की, आत्‍मा मनोविकारांपासून रक्षण करण्‍याच्‍या प्रतिज्ञेत बांधला गेला आहे. जोपर्यंत प्रतिज्ञा जागृत आहे, तोपर्यंत रक्षण होतेच; मात्र जर प्रतिज्ञा मोडली, तर रक्षणसुद्धा होणार नाही.

७. मिष्‍टान्‍नाचे महत्त्व !

भावाच्‍या मनगटावर धागा बांधण्‍यासह प्रतिज्ञेला बळकटी देण्‍याचे कार्य मिष्‍टान्‍न करते. भगवंताचे प्रेम मिष्‍टान्‍नासारखे मधुर असते. तोंड गोड करणे म्‍हणजे मन, वचन आणि कर्म यांमध्‍ये माधुर्य आणणे होय.

८. टिळा लावणे, म्‍हणजे आत्‍म्‍याला जागृत करून त्‍याला त्‍याच्‍यातील शक्‍ती आणि पावित्र्य यांची जाणीव करून देणे

रक्षासूत्र (धागा) हातात बांधले जाते; परंतु परिवर्तनाच्‍या सर्व प्रक्रियेचे केंद्र तर आत्‍मा आहे; परिणामी ‘आत्‍म्‍याला जागृत करणे आणि त्‍याला त्‍याच्‍यातील शक्‍ती अन् पावित्र्य यांची जाणीव करून देणे’, हेही तेवढेच आवश्‍यक असते. ‘टिळा लावणे’, हे आत्‍म्‍यापर्यंत पोचण्‍याचे एक साधन आहे. आपण मस्‍तकावर चंदनाचा टिळा लावून युगानुयुगे तापलेल्‍या आत्‍म्‍याला शीतल करतो आणि त्‍याचा आदर करत असतो. ‘पावित्र्य हा आत्‍म्‍याचा स्‍वधर्म आहे. पवित्रता ही सुख-शांतीची जननी आहे; म्‍हणून प्रत्‍येकाने स्‍वतःच पवित्र आणि योगी बनण्‍याचा प्रयत्न करावा.’

– ब्रह्माकुमारी उर्मिला, शांतीवन

(साभार : ‘ज्ञानामृत’, ऑगस्‍ट २०१२)