कला अकादमीच्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला : आय.आय.टी.चा अहवाल !

कला अकादमीच्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला

पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला, असा अहवाल देहली आय.आय.टी.ने दिल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १० ऑगस्टला विधासभेत दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते म्हणाले, ‘‘राज्याच्या मुख्य सचिवांनी १७ जुलै या दिवशी आय.आय.टी.कडून याविषयी अहवाल करून घेण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. राज्याचे मुख्य अभियंता, आय.आय.टी. मुंबई आणि त्यानंतर आय.आय.टी. देहली यांनी दिलेल्या अहवालात ‘हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्यामुळे ‘स्लॅब’ कोसळला’, असे कारण दिले आहे.’’ कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम चालू असतांना हा ‘स्लॅब’ कोसळल्याने याविषयी विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

कला अकादमीच्या बांधकामाविषयीच्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे, ‘‘कला अकादमीच्या नूतनीकरणाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२३ हा नियोजित दिनांक आहे; परंतु सभागृहाचा स्लॅब कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अहवालानुसार हा प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होईल.’’ बांधकाम करण्यास विलंब केल्याविषयी कंत्राटदाराला दंड आकारणार का ? यावर ‘कंत्राटदाराला सार्वजनिक खात्याकडून वेळ वाढवून देतांना यावर विचार केला जाईल’, असे लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे.