समर्थांसाठी श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत


पुणे
– समर्थांच्‍या वेळची परिस्‍थिती आक्रमणाची होती. लढाई हा धर्माच्‍या संरक्षणाचा केवळ एक भाग आहे; मात्र केवळ लढाई म्‍हणजे धर्माचे संरक्षण नव्‍हे. प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण हेही धर्माचे संरक्षण आहे. हे सर्व श्रीरामाने केले. समाजाला दिशा दाखवण्‍यासाठी आदर्श राजधर्माचे पालन करणे आवश्‍यक होते. प्रभु श्रीरामानंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्‍हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

  प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

श्रीसमर्थवाग्‍देवता मंदिर, धुळे या संस्‍थेच्‍या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्‍वामी लिखित वाल्‍मिकी रामायण’ या ग्रंथाच्‍या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्‍यात आलेल्‍या ८ खंडांचे राष्‍ट्रार्पण सरसंघचालकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते. या ८ खंडांमध्‍ये मूळ हस्‍तलिखितांसमवेत मराठी आणि इंग्रजीत त्‍याचा अनुवाद मांडण्‍यात आला आहे.

या वेळी व्‍यासपीठावर श्रुतिसागर आश्रम, फुलगांव येथील प.पू. स्‍वामी स्‍वरूपानंद सरस्‍वती, श्रीरामदासस्‍वामी संस्‍थान, सज्‍जनगडचे बाळासाहेब स्‍वामी आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.