रामनाथ देवस्थान – भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. त्या काळामध्ये असंख्य ग्रंथ लिहिले गेले. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. भारतातील ८ लाख ८० सहस्र मुले विदेशात शिकत आहेत आणि कालांतराने ते तेथेच स्थायिक होणार आहेत. त्यामुळे भारताने शिक्षणव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे उद्गार ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक श्री. अनिल धीर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी (२०.६.२०२३) काढले.
ते पुढे म्हणाले, ‘‘ओडिशामध्ये ६२ जनजाती आहेत. आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या आणि त्या सर्व ओडिशा राज्याच्या संग्रहालयामध्ये पाठवून दिल्या. त्या पोथ्यांमध्ये श्लोक वगैरे नव्हते, तर विमानांची निर्मिती कशी करावी ?, मंदिरांचे बांधकाम कसे करावे ? आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते. यावरून काही सहस्र वर्षांपूर्वी त्यांनी किती उच्च दर्जाचे लिखाण केले होते, हे लक्षात येते. अशा आदिवासींकडे कोणतीही लिपी नाही. त्यांचे हे ज्ञान वडिलांकडून मुलाकडे हस्तांतरित होत गेले. या आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळाले, तर भारत अधिक चांगली प्रगती करेल. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष शाळा उघडण्याची आवश्यकता आहे.’’
जगन्नाथपुरी येथे २० जून या दिवशी विश्वप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची रथयात्रा असतांनाही या दिवशी ओडिशातील हिंदु धर्माभिमानी श्री. अनिल धीर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये उपस्थित राहिले. |