हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा कळंगुट पंचायतीला संतप्त प्रश्न
फोंडा, २० जून (वार्ता.) – कळंगुट पंचायतीला पोर्तुगालाचा फुटबॉलपटू रोनाल्डो यांचा पुतळा उभारण्यास कोणतीही अडचण नाही; मात्र हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पंचायतीच्या डोळ्यांत का खुपतो ? असा संतप्त प्रश्न हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रामनाथी, फोंडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला श्री. महेश मयेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे श्री. नितीन काकडे, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे आणि स्वराज्य गोमंतक संघटनेचे श्री. प्रशांत वाळके यांची उपस्थिती होती.
कळंगुट पंचायतीने तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १० दिवसांत हटवण्याचा आदेश दिल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींनी पंचायतीच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर रामनाथी येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
(चित्रावर क्लिक करा)
पत्रकार परिषदेत श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेथील शिवप्रेमी गेले वर्षभर प्रयत्न करत होते; मात्र या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’
‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘गोव्यात यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध झाल्यास गोमंतकातील हिंदू तो सहन करणार नाहीत. कळंगुट पंचायत, पंचायत क्षेत्रातील अनधिकृत क्रॉस, अन्य अनधिकृत बांधकामे यांवर तत्परतेने कारवाई का करत नाही ?’’
‘स्वराज्य गोमंतक संघटने’चे प्रशांत वाळके म्हणाले, ‘‘कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा अजूनही पूर्णपणे हिंदुस्थानी झालेले नाहीत आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डोळ्यांत खुपतो. अशी व्यक्ती कळंगुटच्या सरपंचपदी कशी राहू शकते ? असा माझा प्रश्न आहे.’’
(सौजन्य : prime media goa)
|