#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !

शतपैलू सावरकर

२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !

श्री. उदय माहूरकर

क्रांतीकारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान सर्वश्रुत आहे; परंतु त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते, ते त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीमुळे ! राष्ट्राची सुरक्षा आणि विदेशनीती यांविषयी सावरकर द्रष्टे होते. याचे कारण गत ७५ वर्षांत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जी संकटे आली, मग ती आसामची असो, चीन, पाकिस्तान असो किंवा अन्य राष्ट्रीय सुरक्षाविषयक असोत, सावरकर यांनी त्यांविषयी ६० ते ८० वर्षांपूर्वीच भाकीत वर्तवले. फाळणी वर्ष १९४७ मध्ये झाली; परंतु त्याविषयीचे भाकीत सावरकर यांनी वर्ष १९३७ मधील कर्णावती येथील भाषणामध्ये वर्तवले होते. ‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती होऊ शकते’, असे भाकीत सावरकर यांनी या सभेत वर्तवले होते.

वर्तमानकाळात भारत वेगाने प्रगती करत असला, तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशाची सध्य:स्थिती गंभीर आहे. पुढच्या काळात ती अधिक बळावेल. त्या वेळी ही संकटे रोखण्यासाठी सावरकर यांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतील. वीर सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद भारतियांच्या मनात रुजला, तर इस्लामवादी किंवा साम्यवादी लोकांचे मनसुबे उधळले जातील. त्यामुळे या लोकांना सावरकर यांचे विचार धोकादायक वाटतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी मात्र वीर सावरकर यांचे विचार प्रत्येक भारतियापर्यंत पोचायला हवेत.