२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
शतपैलू सावरकर
२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
बेंगळुरू, २५ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यलढ्यात सर्वप्रथम विदेशी कपड्यांची होळी करणारे सावरकर होते ! त्यांनी स्वदेशीची संकल्पना आणली ! सावरकरांनी भारतियांना सांगितले की, तुम्हाला जर ब्रिटिशांशी लढायचे असेल, तर आधी तुम्हाला त्यांच्या अर्थव्यवस्थेशी लढावे लागले, त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकावा लागेल, तरच त्यांना धडा शिकवता येईल. सद्यःस्थितीतही आपल्याला याचेच अनुसरण करावे लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब करावा लागेल, असे वक्तव्य येथील प्रसिद्ध लेखक श्री. रोहित चक्रतीर्थ यांनी केले. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.
श्री. चक्रतीर्थ पुढे म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था सक्षम करणे आणि स्वदेशीचा अवलंब करून देश बळकट करणे या गोष्टी सद्यःस्थितीत आपण सावरकरांकडून शिकायला हव्या. हाच संदेश सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करतांना दिला होता. त्याचे अनुसरण केल्यास आपली अर्थव्यवस्था बळकट होईल आणि भारतीयत्वही प्रकाशझोतात येईल.