२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी हिंदूंनी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, या विषयावर मार्गदर्शन
शतपैलू सावरकर
२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
बेंगळुरू, २४ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या पुढे नेण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘आपण सगळे हिंदू आहोत’, हे मनात ठसवायला हवे. हिंदूंमध्ये एकी असायला हवी आणि ही एकजूट आपल्याला मतदानाच्या वेळी दाखवता आली पाहिजे. हिंदूंना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे. ‘आपल्याला कुणाला मतदान करायचे आहे ?’, हे जिहादी विचारसरणीच्या लोकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. केवळ हिंदु समाजाला ‘सत्ता कशी मिळवायची ?’, हे अजून समजले नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात जाऊन ही जागृती करायला हवी. हिंदू हा शास्त्रसंपन्न, तसेच शस्त्रसज्जही असायला हवा. जर केवळ शास्त्र आहे; पण शस्त्र नसेल, तर शास्त्रही टिकणार नाही आणि हिंदूही जिवंत रहाणार नाही’, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी केले. ते येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते.
सात्यकी सावरकर पुढे म्हणाले की, आज हिंदूंची ‘आर-पार’ची लढाई आहे. हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आपले जे स्त्री-धन आहे, ते लुटारूंच्या हातात पडता कामा नये. या ३ गोष्टी हिंदूंनी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्ही विचारवंत असाल, तर विचारांच्या माध्यमातून आणि लढवय्ये असाल, तर त्या माध्यमातून देशसेवा करायला हवी !