२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
शतपैलू सावरकर
२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
सावरकरांच्या जन्मदिनी (२८ मे) नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणे आनंददायी असल्याचे प्रतिपादन
मुंबई, २३ मे (वार्ता.) – २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती आहे. त्या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्र शासनाने ‘सावरकर सन्मानदिन’ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्त या संपूर्ण सप्ताहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम सध्या महाराष्ट्रभर होत आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. २८ मे या दिवशीच सावरकरांच्या जन्मदिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. भारतीय शासन या पद्धतीने सावरकरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली, तर केवळ सावरकरांचा सन्मान करणे पुरेसे नाही; कारण सावरकरांनी कधीच सन्मानाची अपेक्षा बाळगली नाही.
१०० वर्षांपूर्वी, म्हणजेच वर्ष १९२३ मध्ये त्यांनी ‘हिंदुत्व’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्यातून हिंदूंना एक संदेश दिला होता की, जर हिंदुस्थानला पुन्हा समर्थ आणि संपन्न बनवायचे असेल, तसेच सगळ्या अडचणींवर मात करायची असेल, तर हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा हे सगळे विसरून एकत्र आले पाहिजे. त्या पद्धतीने आपण सावरकरांचे हिंदुत्व अंगीकारल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि ती खरी देशसेवा असेल, असे वक्तव्य ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर उवाच !
एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्यांचे नाही, तर ते त्या घरधन्याचे असते. त्याचप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्थान आहे !
(संदर्भ : सावरकरांची सामाजिक भाषणे- सागरा प्राण तळमळला, अणुध्वमाचे रहस्य शोधा-समग्र सावरकर खंड ९)