२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
‘आजची जागतिक भूराजकीय स्थिती पहाता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार भारताला कसे उपयुक्त आहेत ?’ यावर मार्गदर्शन !
शतपैलू सावरकर
भारतमातेच्या मुक्तीयज्ञात स्वतःच्या सर्वस्वाची आहुती देणारे या युगातील महानायक तथा उच्च कोटीचे देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अग्रगणी क्रांतीकारक होते. स्वतःला झालेली ५० वर्षांची शिक्षा हसत हसत स्वीकारणे, हा त्यांच्यातील प्रखर राष्ट्रभक्तीचा पुरावा होय ! असे असूनही त्यांच्या पदरी नेहमी उपेक्षाच आली. हिंदुद्रोही काँग्रेसने त्यांच्या उभ्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचा द्वेष केला. ‘सावरकर काय तोलामोलाचे होते ?’, याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’मधून सातत्याने प्रकाशित करण्यात येते. हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक म्हणून आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे.
२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यास्तव आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
बेंगळुरू, २२ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारकांच्या चळवळीचे आदर्शवत् प्रतीक होते. ते तत्कालीन भूराजकीय आणि सामाजिक स्थिती यांचे अत्यंत चांगले अभ्यासक होते. ब्रिटीश राजसत्ता ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर आफ्रिका खंड, आयर्लंड यांच्यासाठीही डोकेदुखी असल्याचे त्यांनी हेरले होते. वैचारिक बैठक असल्यामुळे त्यांचा समाजवादी आणि साम्यवादी नेत्यांशीही संपर्क होता. भारतीय मजदूर संघाचे नेते दत्तोपंत ठेंगडी यांच्यानुसार ब्रिटीश जेव्हा रशियाचा साम्यवादी नेता लेनिनच्या मागावर होते, तेव्हा सावरकरांनी त्याला आश्रय दिला होता. याचा अर्थ शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक असते, असे वक्तव्य हिंदु तत्त्वज्ञान, इतिहास आणि संस्कृती या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध लेखक डॉ. जी.बी. हरीश यांनी केले. बेंगळुरू येथील ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.
‘आजची जागतिक भूराजकीय स्थिती पहाता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार भारताला कसे उपयुक्त आहेत ?’, या प्रश्नावर त्यांनी संवाद साधला.
डॉ. हरीश पुढे म्हणाले की, जर ब्रिटनला आपल्याकडून लोकशाही मूल्यांच्या पालनाची अपेक्षा असेल, तर ‘ब्रिटननेही आपल्याला लोकशाहीच्या आधारावर हाताळले पाहिजे’, असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. इस्रायल जेव्हा त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा सावरकर हे पहिले नेते होते, ज्यांनी त्याला समर्थन दिले होते.
एकूणच सावरकरांचा भूराजकीय परिस्थितीचा अभ्यास व्यासंगी होता. ‘तुमचे राष्ट्र सक्षम आणि बलशाली असेल, तरच तुम्हाला आदर मिळेल. तुम्ही सशक्त नसाल, तर जगातील मोठ्या शक्ती तुमचे समर्थन करणार नाहीत’, असे ते नेहमी म्हणत.