आज २०.५.२०२३ पासून ‘गंगा दशहरा प्रारंभ’ होत आहे. त्या निमित्ताने…
‘ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा या दिवशी इक्ष्वाकु कुळातील प्रसिद्ध राजा भगीरथ याने त्याच्या पितरांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रयत्नाने गंगेला प्रसन्न करून पृथ्वीवर आणले.
गंगा स्वर्गातून श्रीविष्णूच्या चरणापासून निघाली. ती शंकराच्या मस्तकावरून खाली पृथ्वीवर वहात आली आणि हरिद्वार, प्रयाग, वाराणसी वगैरे स्थानांवरून पूर्व समुद्राला जाऊन मिळाली. याच गंगेमुळे सगराच्या पुत्रांचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे असत्य भाषण, कठोर भाषण, चहाडी, वृथा वल्गना, चौर्यकर्म, हिंसा, अनीतीकारक विषयभोग, परापहार, दूराग्रह आणि अनिष्ट चिंतन या १० पातकांचे हरण गंगास्नानाने होत असल्याने तिला ‘दशहरा’ असेही नाव आहे.
गंगा नदी ही हिंदुस्थानची वरदायिनी माता आहे. अनेक कवींनी तिचे स्तवन केले आहे. शंकराचार्य म्हणतात ‘‘ हे देवी, तुझ्या जलाचे पान करून सर्व विषयांपासून मी अलिप्त झालो आहे. आता भगवंताचे पूजन करावे, अशी इच्छा आहे. तू तापत्रयाचे निवारण करणारी आहेस.’’ महर्षि वाल्मीकि म्हणतात, ‘‘तुझ्यावरील तरंगांचे सौंदर्य अवलोकन करत आणि तुझे जलपान करत तुझ्या काठी मी वास करून रहावे. तुझे नामस्मरण करत असतांनाच माझा देह पडो.’’
गंगेच्या कथेस सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यांत प्राचीन इक्ष्वाकु वंशाचा इतिहास गोवलेला दिसतो. सगर राजाचे सहस्त्रावधी प्रजानन पूर्व देश कह्यात करण्यासाठी गेले. त्याचेच कार्य पुढे चालवून भगीरथाने आर्यांची विजयपताका ‘गंगासागरावर’ रोविली. ‘सगर’ राजाची स्मृती म्हणून सगरास सागर आणि भगीरथाच्या प्रयत्नाने गंगेच्या काठाचा प्रदेश हस्तगत झाला; म्हणून गंगेस ‘भागीरथी’ हे नाव प्राप्त झालेले असावे.
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))