हिंदु जनजागृती समितीचा गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठीचा यशस्वी लढा !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना मिळालेले यश !

अफझलखानाच्‍या थडग्‍याभोवतीचे अवैध बांधकाम पाडत असतांनाचे दृश्‍य

१. प्रतापगडावरील अफझलखानाच्‍या थडग्‍याभोवती केलेले अवैध बांधकाम तात्‍काळ पाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड युद्धात केलेल्‍या पराक्रमाचे एक शिल्‍प बनवावे, तसेच अफझलखानाच्‍या कबरीच्‍या भूमीला ‘शिवप्रतापभूमी’ असे नाव देण्‍यात यावे, या मागणीचे निवेदन समिती आणि सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी मुख्‍यमंत्र्यांना निवेदन दिले होते. गेली अनेक वर्षे न्‍यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्‍या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही; मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शिवप्रेमींच्‍या जिव्‍हाळ्‍याचे आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेले अफझलखानाच्‍या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम अफझलखानाच्‍या वधाच्‍या म्‍हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्‍या निमित्ताने (१० नोव्‍हेंबर २०२२ या दिवशी) पाडण्‍यास घेतले.

२. वाई (जिल्‍हा सातारा) तालुक्‍यातील ऐतिहासिक ‘किल्ले वंदनगड’चे नाव पालटून ‘पीर किल्ले वंदनगड’ असे करत इतिहास पालटण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला होता. समितीने तत्‍परतेने मा. मुख्‍यमंत्री, पुरातत्‍व विभाग आणि वन विभाग यांना निवेदन देत हा गंभीर विषय उघडकीस आणला. ‘गडाचे नाव ‘किल्ले वंदनगड’ असेच राहिले पाहिजे’, अशी मागणी करत आंदोलनाची चेतावणी दिली. त्‍यानुसार वाई (जिल्‍हा सातारा) वनपरिक्षेत्र अधिकारी एस्.एस्. मगर यांनी ‘वन विभागाकडून ‘किल्ले वंदनगडा’चे नाव पालटण्‍यात आले नाही आणि यापुढे पालटण्‍यात येणारही नाही’, अशी लेखी हमी समितीला दिली.

गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन !

गड-दुर्गांवरील अतिक्रमण काढून त्‍यांचे संवर्धन करण्‍याविषयी २२ ऑगस्‍ट २०२२ या दिवशी मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. त्‍या वेळी ‘विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्‍यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या शिष्‍टमंडळाला दिले.


केंद्रीय विधी आणि न्‍याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल यांना निवेदन !

केंद्रीय विधी आणि न्‍याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल (डावीकडे) यांच्‍याशी चर्चा करतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

विशाळगड येथे झालेल्‍या अतिक्रमणाविषयी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने २४ ऑगस्‍ट २०२२ या दिवशी केंद्रीय विधी आणि न्‍याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन देण्‍यात आले. त्‍या वेळी त्‍यांनी ‘संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन उपस्‍थितांना दिले.


  • महाराष्‍ट्रातील गड-दुर्गांचे संवर्धन करणे, तसेच त्‍यावरील अतिक्रमणे हटवणे याविषयी सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिल्‍यावर त्‍यांनी ‘गडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्‍याची कार्यवाही लवकरात लवकर करावी’, असे प्रशासनाला आदेश दिले.
  • हिंदु जनजागृती समितीच्‍या पाठपुराव्‍यानंतर जळगाव येथील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा गडाच्‍या संवर्धनासाठी जिल्‍हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. संवर्धन करण्‍यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्‍हे नोंदवण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिले.
  • विशाळगडावरील इस्‍लामी अतिक्रमणांविषयी समितीने स्‍थानिक शिवप्रेमी संघटनांना एकत्र करून विशाळगड अतिक्रमणविरोधी समिती स्‍थापन केली. या अतिक्रमणविरोधी समितीच्‍या माध्‍यमातून ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा’ ही मोहीम चालू केली. त्‍या अंतर्गत अनेक ठिकाणी आंदोलने करण्‍यात आली. पुरातत्‍व विभागाच्‍या अधिकार्‍यांना भेटून निवेदने देण्‍यात आली. सोशल मिडिया, टि्‌वटर ट्रेंड या माध्‍यमांतून जागृती करण्‍यात आली. परिणामी जिल्‍हाधिकार्‍यांना विशाळगडावरील अतिक्रमण तोडण्‍यासाठी नोटीस काढावी लागली. जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णपणे काढले जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार आहे.
  • हिंदु जनजागृती समितीने गडकोट संवर्धन मोहिमेच्‍या अंतर्गत राबवलेल्‍या विजयदुर्ग गड संवर्धन मोहिमेची नोंद आमदार नितेश राणे यांनी घेत समितीच्‍या येथील कार्यकर्त्‍यांशी संपर्क साधला. त्‍यानंतर समितीच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांची भेट घेऊन समितीने हाती घेतलेल्‍या राज्‍यातील ‘गडकोट संवर्धन मोहिमे’ची माहिती दिली, तसेच देवगड तालुक्‍यातील विजयदुर्ग गडाच्‍या संवर्धनासाठी निवेदन देऊन ‘स्‍थानिक आमदार म्‍हणून याविषयी पाठपुरावा करावा’, अशी विनंती करण्‍यात आली.
  • महाराष्‍ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्‍यात आली.

संपादकीय भूमिका 

ऐतिहासिक गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समितीचा लढा भविष्‍यात ऐतिहासिकच ठरेल !