मी गेल्या ८ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. अन्य विशेषत: मुख्य मार्गी दैनिकांपेक्षा सनातनचा अंक पूर्ण वेगळा आहे. यात धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षणार्थ वृत्ते आणि लेख असतात. ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’ (अर्थ : धर्माचे रक्षण करणार्याचे रक्षण धर्म करतो.) हे सत्यात उतरवण्यासाठी साधकांनी साधना म्हणून हे दैनिक चालवलेले आहे. ‘दैनिक चालवणे हा समष्टीतील पुष्कळ मोठा कर्मयज्ञ असून गेली २२ वर्षे तो अहर्निश चालू आहे’, असे वाटते.
संपूर्ण अंक म्हणजे आपला गुरु असल्यासारखाच वाटतो. त्यामुळे सकाळी नेमाने तो वाचतो. त्यातील ‘संपादकीय’ हे माझे अगदी आवडते सदर आहे. साधनेविषयी इतर साधकांचे अनुभव, तसेच सद्गुरूंचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन असलेली पृष्ठेही पुष्कळ वाचनीय असतात. दैनिकाच्या वाचनाने साधना आणि नामजप करण्याची प्रेरणा मला मिळाली. याचसमवेत नामजप करतांना स्वभावदोषांचा मोठा अडथळा मी अनुभवतो आहे. तो दूर करण्यासाठी सनातनचे दैनिकच मार्ग दाखवते.