हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संस्था यांसह समाजातील प्रत्येक घटकाला आधारस्तंभ वाटणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे समाजातील प्रत्येक घटकाला आधारस्तंभ वाटत आहे. मग त्या हिंदुत्वनिष्ठ संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, प्रशासन असेल अथवा अन्य सामान्य लोकही असतील. हिंदूंवर जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अत्याचार झाला, तर त्याचे वृत्त सनातनमध्ये येणारच आणि त्याला वाचा फोडण्याचे काम सनातन प्रभातच करू शकते, अशीही आता हिंदूंची धारणा बनत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ आज हिंदूंसाठी, हिंदु समाजासाठी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे केवळ सामायिक व्यासपीठच नाही, तर दैनिक ‘सनातन प्रभात’मधून कत्तलीपासून वाचवलेल्या गायींच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक साहाय्याचे आवाहन केल्यावर अनेकांनी ते केले. यावरून समाजात ‘सनातन प्रभात’वरील विश्वासार्हता दिसून येते. दैनिक ‘सनातन प्रभात’ समाजासाठी आधारस्तंभ ठरत आहे.

श्री. अजय मुकुंद केळकर

संकलक : श्री. अजय मुकुंद केळकर, वार्ताहर, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर.

प्रशासन

ऑक्टोबर २०२२ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ने खासगी ट्रॅव्हल्स’च्या मनमानी कारभाराच्या विरोधात मोहीम राबवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळातील अधिकार्‍यांशी या संदर्भात चर्चा होत असे. त्या वेळी ते अधिकारी ‘‘तुमच्यासारखे एस्.टी.चे हित जपणारे लोक आहेत, हे पाहून आनंद वाटला. आजपर्यंत अन्य कुठल्याही दैनिकाने आजपर्यंत अशा प्रकारे आत्मियतेने प्रवासी संख्या वाढण्यासाठी अथवा एस्.टी.च्या हितासाठी प्रयत्न केले नाहीत’’, असे म्हणाले. कोल्हापूर येथील विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनीही या संदर्भात दैनिकाचे कौतुक केले.

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर

गड-दुर्ग संवर्धन

दीपावलीच्या कालावधीत सांगली-कोल्हापूर येथील काही मंडळांनी सिद्ध केलेल्या गडांच्या प्रतिकृतींची माहिती दैनिकात प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी कोल्हापूर येथील ‘विजेता तरुण मंडळा’चे अध्यक्ष श्री. पंकज पोवार म्हणाले,‘‘गड-दुर्गांच्या संदर्भात इतक्या आत्मियतेने आजपर्यंत कुणीही माहिती घेतली नव्हती. तसेच गडांविषयी सविस्तर माहिती दिल्याने आमचे कार्य अनेकांपर्यंत पोचवण्यास साहाय्य झाले’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

वारकर्‍यांचा विश्वास

कार्तिक वारीच्या काळात ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वारकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याविषयी अनेक वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. ‘आमचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर मांडण्यासाठी आमचे हे हक्काचे व्यासपीठ आहे, असे आम्हाला वाटते, असे ह.भ.प. अनंत सातपुते यांनी सांगितले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विश्वास

१. कोल्हापूर शहरात मध्यंतरी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंदोलन आयोजित केले होते. त्या आंदोलनासाठी अन्य कुठल्याही दैनिक अथवा वृत्तवाहिनीचा पत्रकार उपस्थित नव्हता. त्या वेळी संबंधित संघटनेचे एका पदाधिकारी म्हणाले, ‘‘अन्य कुठल्याही दैनिकाचे प्रतिनिधी आले नाही, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी येणार, याची मला निश्चिती होती. हे वृत्त अन्य कुणी जरी दिले नाही, तरी ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार याची मला निश्चिती आहे.’’ यावरून समाजात हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्येही दैनिकाप्रती असलेली विश्वासार्हता लक्षात येते.

२. सांगली/कोल्हापूरमध्ये अनेक वेळा हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलने होतात. अनेक प्रसंगी पत्रकार उपस्थित नसतात. तेव्हा अशा अनेक प्रसंगांमध्ये केवळ मी एकच प्रतिनिधी उपस्थित असायचो, अशा वेळी ‘हे वृत्त मी अन्य दैनिकांना देणार’, अशी त्यांची निश्चिती असायची आणि प्रत्यक्षात तसे होत असे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अन्य उपक्रमांनाही नियमित प्रसिद्धी दिली जाते.

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर

गोरक्षकांच्या संदर्भात वार्तांकनातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तामुळे कत्तलीपासून वाचलेल्या गोवंशियांना आर्थिक साहाय्य मिळणे !

दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये ३ डिसेंबर २०१९ या दिवशी ‘पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तात कत्तलीपासून वाचलेल्या गोवंशियांना चारा, दूध आणि अन्य साहाय्य आवश्यक असून त्यासाठी ज्यांना साहाय्य करायचे आहे, त्यांनी सांगली येथील ‘अमिझरा पार्श्वनाथ देहरासर’चे अध्यक्ष श्री. सुभाष शहा यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले होते. हे वृत्त वाचून पुणे येथील, तसेच अन्य काही ठिकाणांहून श्री. शहा यांना आर्थिक साहाय्यासाठी दूरभाष आले आणि त्यांनी ते केलेही. अशा प्रकारे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्तामुळे कत्तलीपासून वाचलेल्या गोवंशियांना आर्थिक साहाय्य मिळाले, याविषयी श्री. शहा यांनीही समाधान व्यक्त केले.

१. ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राज्यातील विविध गोप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या प्रसंगी अन्य कुठल्याही दैनिक अथवा वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. तेव्हा त्यांची ‘बाईट’ (छोटी मुलाखत) सिद्ध करून, तसेच वृत्त करून छायाचित्रासह अन्य दैनिकांना पाठवल्यावर सर्व गोरक्षकांनी समाधान व्यक्त केले. या संदर्भात ‘गो सेवा समिती’चे श्री. अशोक पोतनीस, ‘गो संवर्धन महासंघा’चे अध्यक्ष श्री. विजय वरुडकर यांनी समाधान व्यक्त केले.

२. गोरक्षकांच्या संदर्भात राज्यस्तरीय कार्य करणार्‍या गोरक्षकांचा एक ‘व्हॉट्सॲप’चा गट आहे. त्यात मी नेहमी ‘सनातन प्रभात’मधील गोवंशियांच्या संदर्भातील वृत्त पाठवतो. या संदर्भात गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. अंकुश गोडसे म्हणाले, ‘‘गायींच्या संदर्भात देशातील कानाकोपर्‍यात कुठेही होणार्‍या घटना ‘सनातन प्रभात’मध्ये वाचावयास मिळतात, तसेच या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य केवळ राज्यात नाही, तर देशात कुठे-कुठे चालू आहे हेही कळण्यास साहाय्य होते.’’

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळते. ज्याप्रमाणे हनुमंत अखंडपणे सेवारत होता. हनुमंतरायाला श्रीराम राज्याभिषेकाच्या प्रसंगी कोणत्याही दागिन्याची हौस नव्हती, तर त्याला केवळ प्रभु श्रीराम आणि त्यांची सेवा हवी होती. त्याप्रमाणे श्री गुरूंनी श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करवून घ्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना ! – श्री. अजय मुकुंद केळकर, कोल्हापूर.


कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सत्य आणि परखड लिखाण प्रकाशित करणे, हे ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांचे वैशिष्ट्य ! – शाम साखरे, अध्यक्ष, दासबोध मंडळ, मिरज, सांगली

श्री. शाम साखरे

मी गेली अनेक वर्षे ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. समर्थ रामदासस्वामी यांचे हिंदुत्व, भारतीय संस्कृती आणि भारतीय सण, व्रते अन् वैकल्ये यांचा मी उपासक असून हाच वसा घेऊन ‘सनातन प्रभात’ वाटचाल करत आहे. सत्य आणि परखड लिखाण कुणाचाही मुलाहिजा न ठेवता प्रकाशित करणे, हे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वैशिष्ट्य आहे. देश-विदेशातील कोणत्याही भागात हिंदु समाजावर होणारे अत्याचार-अन्याय यांना वाचा फोडणे, देवतांची विटंबना अशा प्रकारांना त्वरित प्रसिद्धी देऊन जनमानसाला संघटित करण्याचे पवित्र कार्य होते. अनेक वैशिष्ट्यपूर्ण वृत्तांची कात्रणे काढून मी माझ्या संग्रही ठेवली आहेत.

समाजाला धर्मशिक्षण देणारे वृत्तपत्र !

देशहिताच्या पवित्र कार्यात अनेक संकटे आणि अडथळे दैनिकाला सहन करावे लागले आहेत; मात्र संपादक मंडळ निर्भिडपणे हे देश अन् धर्म कार्य पार पाडत आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्याचे ईश्वरी कार्य हे वृत्तपत्र करत आहे. आमच्या ‘समर्थ सेवा मंडळा’च्या विविध उपक्रमांना वारंवार सविस्तर, तसेच छायाचित्रांसह प्रसिद्धी देऊन आम्हालाही आपण उपकृत केले आहे. दैनिकाचे वार्ताहर, वितरक, तसेच सर्व साधक यांच्यात अत्यंत नम्रता असून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य निःस्पृहपणे त्यांच्याकडून होत आहे. ‘सनातन प्रभात’चे हे ईश्वरी कार्य असेच वृद्धींगत होऊन प्रत्येक हिंदूच्या घरी हे वृत्तपत्र पोचावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

एवढे उद्बोधक आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रेरणेने भारलेले दैनिक मी प्रथमच पहात आहे ! – संतोष मांढरे, ईश्वरी दिशा आरोग्य सेवा संघ संस्थापक, पुणे

दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, तेव्हापासून आतापर्यंतचे दैनिकाचे सर्व अंक मला पहायला मिळतील का ? इतके उद्बोधक आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रेरणेने भारलेले दैनिक मी प्रथमच पहात आहे. (श्री. संतोष मांढरे यांचे ‘ईश्वरी दिशा आरोग्य सेवा संघ’ कार्यालय आहे. त्यामध्ये ते स्व. राजीव दीक्षित यांच्या विचारांनुसार समाजाला नैसर्गिकरित्या पिकवलेली धान्ये, गूळ, पंचगव्य यांपासून बनवलेल्या उदबत्त्या देतात, तसेच आयुर्वेदिक उपचार करतात.)

श्री. मांढरे यांनी सनातन संस्थेचे मोठे ग्रंथ आणि लघुग्रंथ मोठ्या प्रमाणावर घेतले आहेत. ग्रंथांचे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर ते म्हणाले, ‘‘असे मुखपृष्ठ केवळ सनातन संस्थाच सिद्ध करू शकते. त्यांची रंगसंगती पुष्कळ सुंदर असते.’’ सनातनच्या साधकांविषयी ते नेहमी आदरयुक्त बोलतात. ते त्यांच्या डोणजे येथील गावामध्ये पुस्तकांचे गाव सिद्ध करणार आहेत. त्या ठिकाणी सनातन संस्थेचे सर्व ग्रंथ ठेवणार आहेत.

व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त माहिती समजते ! – मधुसूदन सोन्ना, पुणे

निवृत्तीवेतन घेण्यासाठी लागणारे ‘लाईफ सर्टिफिकेट’ देण्याचा दिनांक आपल्या दैनिकातूनच मी पहिल्यांदा वाचला. त्यामुळे त्याचा लाभ झाला होता. त्याचसमवेत बाहेरगावी जाण्यापूर्वी आरक्षण करण्याविषयी साधकांना देण्यात येणारी सूचना वाचून ‘बाहेर जाण्यापूर्वी आरक्षण करणे आवश्यक का आहे ?’ अशी विचारप्रक्रिया वाढते आणि योग्य कृती होते.

प्रतिदिन ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना करमत नाही ! – गणेश कुलकर्णी, गावठाण

‘सनातन प्रभात’ हे दिवसेंदिवस स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. मला प्रतिदिन ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना करमत नाही. विषयाची मांडणी अचूक, मुद्देसूद आणि वस्तूनिष्ठ असल्यामुळे ते भावते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदु राष्ट्राची मागणी ‘सनातन प्रभात’ प्रथमपासून करत आहे. ‘आगामी काळात हिंदु राष्ट्र येणार’, याची ‘सनातन प्रभात’समवेत मलासुद्धा निश्चिती आहे.

सर्व भारतियांना ‘सनातन प्रभात’ वाचण्याची शिफारस करीन ! – नितीन काळे, चिंचवड

‘सनातन प्रभात’ हे महान वृत्तपत्र आहे. जेव्हा मी ‘सनातन प्रभात’ वाचायला प्रारंभ करतो, तेव्हा मला पुष्कळ बरे वाटते. मी सर्व भारतियांना ‘सनातन प्रभात’ वाचण्याची शिफारस करीन.


वाचकांचे विचार !

‘सनातन प्रभात’ हे सात्त्विक विचार प्रसारण करणारे दैनिक आहे. प्रगल्भ विचार, सडेतोड प्रतिक्रिया आणि विश्वसनीय माहिती तत्परतेने वाचकांपर्यंत पोचवणारे दैनिक आहे. – मुरुडे, चिंचवड

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या घटना समजतात. अगदी आवर्जून वाचावे असे लेख असतात. – श्री. सुनील पोतदार, चिंचवड

‘सनातन प्रभात’मधील हिंदुत्वाच्या संबंधित बातम्या आवडतात ! – कैलास परब, चिंचवड

‘सनातन प्रभात’मधील हिंदुत्वाच्या संबंधित बातम्या आणि त्यावर केलेले प्रयत्न वाचायला पुष्कळ आवडतात. विज्ञापने देण्याच्या माध्यमातून मी कार्यात सहभागी होतो.