दत्तजयंतीचे महत्त्व आणि ती कशी साजरी करावी ?

दत्तजयंती म्हणजे सांप्रदायिक जन्मोत्सव ! मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

इतिहास

‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.’

महत्त्व

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १,००० पटींनी कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

जन्मोत्सव साजरा करणे

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी ७ दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच ‘गुरुचरित्रसप्ताह’ असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेष करून कीर्तन इत्यादी भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तमिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

दत्तजयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

  • स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.
  • विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.
  • मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.
  • उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.