‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्याविषयी खोटे वृत्त दिल्याचे प्रकरण

शिवराय कुळकर्णी व गिरीश कुबेर

अमरावती, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त खोटे, अपसमज पसरवणारे, जातीय सद्भाव बिघडवणारे आणि काही समाजघटकांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, नागपूर आवृत्तीचे राजेश्‍वर ठाकरे आणि मालक यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात यावी’, अशी तक्रार येथील भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार वरील व्यक्तींवर बडनेरा पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर या दिवशी १५३, ५००, ५०१, ५०२, ५०४ आणि ३४ अशा विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नागपूर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शास्त्र आणि रिवाज यांचे दाखले देत आपल्या देशात जातीभेद नसल्याचे स्पष्ट केले होते.

या कार्यक्रमाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ८ ऑक्टोबर या दिवशी प्रकाशित केले. या बातमीत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालण्यात आले. ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य त्यांनी म्हटलेले नव्हते. ते न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.  ‘संघविरोधकांनीही चिंतन करावे’, असे ते भाषण होते.