तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.

तमिळ दैनिक ‘दिनमलार’ने दिलेल्या वृत्तानुसार,

१. तिरुचेंदुराई गावात शेतभूमी असलेल्या मुल्लिकारुपूर येथील राजगोपाल यांनी त्यांची १ एकर शेतभूमी राजराजेश्‍वरी यांना विकण्यासाठी करार केला होता. त्यासाठी ते नोंदणी कार्यालयात ३ लाख ५० सहस्र रुपयांच्या खरेदी कराराची नोंदणी करण्यासाठी गेले असता ‘ही भूमी तमिळनाडू वक्फ बोर्डाची असल्याने नोंदणी करता येणार नाही. भूमी विकण्यासाठी चेन्नईतील तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या कार्यालयातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागेल’, असे सब-रजिस्ट्रारने सांगितले.

२. राजगोपाल यांनी ‘वर्ष १९९२ मध्ये खरेदी केलेली भूमी विकण्यासाठी वक्फ बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता काय ?’, अशी विचारणा केली. तेव्हा सब-रजिस्ट्रारने त्यांना सांगितले, ‘तिरुचेंदुराई गावात कोणत्याही भूमीचा खरेदी-विक्री करार करायचा असेल, तर वक्फ बोर्डाची अनुमती घ्यावीच लागेल. वक्फ बोर्डाने संपूर्ण गाव त्यांच्या मालकीचे असल्याचे कागदपत्रांसह नोंदणी विभागाला पत्र पाठवले आहे आणि जे गावात भूमीसाठी करारनामा करण्यासाठी येतात त्यांना बोर्डाकडून अनुमती घ्यावी लागेल.’ यासंदर्भातील २५० पानी वक्फ बोर्डाच्या पत्राची प्रतही त्यांना दाखवण्यात आली. त्या पत्रात वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील सहस्रो एकर भूमी स्वतःची असल्याचे म्हटले आहे.

बहुसंख्य हिंदू असलेल्या गावावर वक्फ बोर्डचा काय अधिकार ? – भाजप

भाजप नेते अल्लूर प्रकाश यांनी सांगितले की, तिरुचेंदुराई गाव हे कावेरी नदीच्या दक्षिण तिरावर असलेले एक नयनरम्य कृषी गाव आहे, जिथे बहुसंख्य लोक हिंदू आहेत. वक्फ बोर्ड आणि तिरुचेंदुराई गाव यांच्यात काय संबंध आहे ? तेथे मानेंदियावल्ली समेथा चंद्रशेखर स्वामी मंदिर आहे. हे मंदिर १ सहस्र ५०० वर्षे जुने असल्याचे विविध कागदपत्रे आणि पुरावे यांच्यासह सिद्ध होते. तिरुचेंदुराई गावाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मंदिराची ३६९ एकर भूमी आहे. ही मंदिराची भूमीही वक्फ बोर्डाची कशी असू शकते?

जेव्हा गावातील व्यक्तीकडे भूमीची कागदपत्रे असतात, तेव्हा कोणत्याही पुराव्याखेरीज वक्फ बोर्ड ती मालमत्ता स्वतःची असल्याचे कसे घोषित करू शकते ? वक्फ बोर्डाने भूमी स्वतःच्या मालकीच्या असल्याचा दावा करणारे पत्र दिले असले, तरी वक्फ बोर्डाच्या दाव्यांची पडताळणी केल्याखेरीज नोंदणी न करण्याचे आदेश नोंदणी विभागाचे उच्च अधिकारी कसे काय देऊ शकतात ?

संपादकीय भूमिका

तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार आहे कि वक्फ बोर्डाचे ?