मसाला पिकांची (काळी मिरी आणि जायफळ यांची) लागवड कशी करावी ?

२९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची सूत्रे पाहिली. आजच्या लेखाद्वारे काळी मिरी आणि जायफळ यांची लागवड करण्यातील विविध टप्पे समजून घेऊया.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/600277.html


४. काळी मिरी

४ अ. लागवड : सुपारीच्या बुंध्यापासून पूर्वेस ६० सें.मी. अंतरावर तर नारळाच्या बुंध्यापासून १ मीटर अंतरावर उत्तरेस ३० x ३० x ३० सें.मी. आकाराचे दोन खड्डे खणावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन घमेली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि अर्धा किलो ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ वरच्या थरात मिसळावे. प्रत्येक खड्ड्यात मुळे फुटलेले एक रोप लावावे. मुख्य पिकासाठी २.५ x २.५ मी. ते ३.० x ३.० मी. अंतरावर सिल्व्हर ओक किंवा भेंड रोपे मिरी लावण्याच्या एक वर्ष अगोदर लावून घ्यावेत. नंतर प्रत्येक खुंट झाडाजवळ ४५ सें.मी. अंतर सोडून पूर्व आणि उत्तर दिशेस मुळ्या फुटलेली छाट कलमे लावावीत. सांडपाण्याचा उपयोग करून घराजवळील शोभेच्या झाडावर किंवा फणसावरही काळी मिरी वेलांची लागवड करता येते.

४ आ. निगा : लागवडीनंतर मिरीचे वेल झाडावर व्यवस्थित वाढण्यासाठी सैल दोर बांधून घ्यावा. वेलाची उंची ६ मीटरपेक्षा अधिक वाढू देऊ नये. भेंड, सिल्वर ओक, पांगारा यांच्या खुंटावर काळ्या मिरीचे पीक घेतले असल्यास खुंटाची उंची ८ मीटरपेक्षा अधिक वाढू देऊ नये. एप्रिल ते मे या कालावधीत फांद्यांची छाटणी करून योग्य प्रकारची सावली द्यावी. वेलाला हिवाळ्यात ७ ते ८ आणि उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ३ वर्षांपासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, ३०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आणि २५० ग्रॅम ‘म्युरेट ऑफ पोटॅश’ द्यावे. ही खते दोन समान हप्त्यांत ऑगस्ट – सप्टेंबर आणि जानेवारी – फेब्रुवारी या कालावधीत द्यावीत. खत भूमीत चांगले मिसळावे. वेलीचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे. काळी मिरीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रती मिरी वेलावर जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या मासांमध्ये २५ टक्के ८ दिवस साठवलेल्या गोमूत्राची फवारणी आणि २५ टक्के द्रावणाची भूमीत एक जिरवणी करावी. त्याचप्रमाणे यासह शिफारस केलेल्या खताच्या मात्रा द्याव्यात.

डॉ. निवृत्ती चव्हाण

४ इ. काढणी आणि उत्पन्न : मिरीच्या वेलाला साधारणतः तिसर्‍या वर्षापासून फळे धरू लागतात. ८ व्या वर्षापासून त्याला पुष्कळ पीक मिळते. एप्रिल ते जून मासांत मोहोर येऊन जानेवारी ते मार्च या काळात ते फळे तोडण्यास सिद्ध होते. मिरीच्या घोसातील एक ते दोन दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच मिरीचे सर्व घोस काढावेत आणि दुसर्‍या दिवशी या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावेत. उन्हामध्ये ३ ते ४ दिवस मिरी चांगली वाळवावी. वाळवल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडतात आणि गडद काळा रंग येतो. पूर्ण वाढ झालेल्या एका वेलापासून सरासरी ५ किलो हिरवी मिरी आणि दीड किलो वाळलेली काळी मिरी मिळते. हिरव्या मिरीच्या दाण्यावरील साल काढून पांढरी मिरीही सिद्ध करता येते. तिला परदेशात अधिक मागणी आहे.

५. जायफळ

 

जायफळाच्या झाडापासून जायफळ बी आणि जायपत्री हे मसाल्याचे दोन पदार्थ मिळतात. जायफळाच्या टरफलाचा उपयोग गोड कँडी, टरफल पावडर, लोणचे आणि चटणी इत्यादींसाठी करतात. मसाल्यामध्ये जायपत्री आणि जायफळ यांचा उपयोग केला जातो.

५ अ. सुधारित वाण (जाती) : कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता यांची लागवड करावी.

५ आ. लागवड : जायफळाच्या झाडावर कायम ५० टक्के सावली राहील, अशा ठिकाणी लागवड करावी. ५ ते ७ वर्षांवरील नारळ – सुपारीच्या बागामध्ये ५.४ x ५.४, तर नारळाच्या बागेत ७.५ x ७.५ मीटर अंतरावर ९० x ९० x ९० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे भरतांना वरच्या थरात सुपीक माती आणि १० किलो शेणखत, १ किलो निंबोळी पेंड अन् १ किलो ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आणि १०० ग्रॅम १.५ टक्के ‘क्लोरोपायरीफॉस’ पावडर घालावी. जून मासाच्या प्रारंभी १ वर्ष वयाची कलमे खड्ड्याच्या मध्यभागी लावावीत. मादी कलमे लावली असल्यास १० टक्के नर कलमे परागीकरण आणि फलधारणा यांसाठी लावावीत. कलमे लावल्यानंतर कलमाच्या जोडाखाली खुंटापासून येणारी फूट सतत काढावी. भूमी आणि हवामान यांच्यानुसार आवश्यकतेप्रमाणे भूमीत ओल रहाण्यासाठी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

५ इ. खते : १० वर्षांपासून प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत, १ किलो युरिया, ६५० ग्रॅम ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आणि १ किलो ‘म्युरेट ऑफ पोटॅश’ द्यावे.

५ ई. पाणी व्यवस्थापन : नारळ – सुपारी यांच्या बागांना जेव्हा पाणी देतात, त्या वेळी जायफळांच्या कलमांना पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडल्यास मोठ्या प्रमाणात कोवळी फळे गळून पडतात.

५ उ. काढणी आणि उत्पन्न : कलमाची लागवड केल्यापासून ४ वर्षांत फळाचे उत्पन्न चालू होते. रोपापासून लागवड केल्यास अनुमाने ५० टक्के नर झाडे मिळतात आणि मादी झाडापासून ७ ते ८ वर्षांनंतर फळे मिळतात. झाडापासून वर्षभर फळे मिळत असली, तरी जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्वाधिक फळे मिळतात. पूर्ण पक्व झालेल्या फळांच्या टरफलाला तडा जातो. अशी फळे गोळा करावीत किंवा काढावीत. टरफल काढून जायपत्री आणि जायफळ बी वेगळे करावे. ७ दिवसांत जायपत्री आणि १५ ते २० दिवसांत बी वाळते. पावसाळ्यात बी वाळवणी यंत्रात ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानास वाळवावी किंवा ऊन असल्यास उन्हात वाळवावी. १० वर्षांच्या कलमी झाडापासून ५०० ते ६०० फळे मिळतात.

मसाल्याच्या पिकांना द्यावयाची खते !

(समाप्त)

संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२२)