सेंद्रिय शेतीच हवी !

रासायनिक खत हे शेतीत उत्पादन वाढवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. अद्यापही या खतांचा वारेमाप वापर होत आहे. त्याच्या अतीवापराने भूमी, पर्यावरण आणि मानवी आरोग्य बिघडले आहे. ‘राज्यात सर्वाधिक ५.५० लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर एकट्या जळगाव जिल्ह्यात होतो’, अशा आशयाची बातमी वाचनात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह अन्य जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले. रासायनिक पडताळणी अहवालानुसार या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण ६० ते ८० मिलिग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले आहे. (पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतीलिटर ४५ मिलिग्रॅमपेक्षा अधिक नसावे.) परिणामी जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आता केंद्रशासन सेंद्रिय, म्हणजेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये व्यय करून विविध योजना चालू केल्या आहेत; तरीही रासायनिक खतांचे उत्पादन आणि वापर अल्प होतांना दिसत नाही. वर्ष २०२३-२४ मध्ये युरियाचे उत्पादन ३१४.०९ लाख टनांवर झाले. अन्य रासायनिक खतांचा वापरही वाढला आहे. युरियासह अन्य नत्रयुक्त मिश्र खते, स्फुरद आणि पालाश खतांच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. एकूण रासायनिक खतांचा वापर ६३९ लाख टनांवर गेला आहे. रासायनिक खतांमुळे जैवविविधता अल्प होते. मातीत असणारे सूक्ष्म जीव, शेतकर्‍याचा मित्र म्हणवले जाणारे गांडूळ आणि कीटक यांवरही रासायनिक घटकांचा वाईट परिणाम होतो. या सजिवांमुळे मातीचा पोत राखला जातो आणि भूमीची उत्पादनक्षमता वाढत असते. जर हे सजीव नष्ट झाले, तर मातीची उत्पादकता अल्प होते आणि जैवविविधतेचा र्‍हास होतो. जी भूमी सहस्रो वर्षांपूर्वी होती, तीच आजही आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ तिचे भाग (तुकडे) पडले आहेत. पूर्वजांनी आपल्या कह्यात दिलेली भूमी पुढच्या पिढीला उत्पादनक्षम स्थितीत हस्तांतरित होईल कि नाही ? हा प्रश्नच खतांच्या अतीवापरामुळे निर्माण झाला आहे. आतापर्यंत आपण प्रदूषित म्हणून शहरांकडे पहात होतो; आता मात्र ग्रामीण भागातील पिण्याचे पाणीही दूषित होत आहे, तेही रासायनिक खतांच्या वापरामुळे होत आहे, हे चिंताजनक आहे. म्हणजे भूमीचा पोतही गेला आणि आता पाण्याचे प्रदूषणही वाढले. म्हणून भूमीचा पोत सुधारण्यासाठी रासायनिक खतांचा वापर बंद करून शेणखतासह सेंद्रीय खतांचा, नैसर्गिक घटकांचा वापर करून सिद्ध केलेल्या कीटकनाशकांचा (दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क) वापर करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

– श्री. नीलेश पाटील, शेतकरी, जळगाव.